शाळा कमी होऊन दारू दुकाने वाढली : सुप्रिया सुळे | पुढारी

शाळा कमी होऊन दारू दुकाने वाढली : सुप्रिया सुळे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय खोके सरकारचा दिवस सुरू होत नाही. या ट्रिपल इंजिन खोके सरकारच्या काळात शाळा कमी होऊ लागल्या आहेत आणि दारूची दुकाने वाढू लागली आहेत. शाहू, फुले व आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या गोष्टी आवरा. मी खरे बोलतो, असा डांगोरा तुम्ही पिटता मग ललित पाटील पळून का गेला? याचे उत्तर द्या, असा सवाल राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी ना. शंभूराज देसाई यांना केला. खा. सुप्रिया सुळे या कोरेगाव तालुक्यातील अंबवडे येथील स्वाभिमान सभेसाठी सातार्‍यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.

दसरा-दिवाळीत राष्ट्रवादीत धमाका होणार, असे म्हणणार्‍या सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दारूची दुकाने कमी केली नाहीत. ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये शाळा कमी होऊन दारूची दुकाने वाढू लागली आहेत, हे ना. शंभूराज देसाई यांचे अपयश आहे असे सांगून खा. सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय सरकारचा दिवस उगवत नाही व मावळतही नाही. आमच्यावर कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी घुमून फिरून शेवटी नाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्केटमध्ये चालते.

ललित पाटील हा गृहमंत्र्यांच्या काळातच पळून गेला. याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यायला नको? असा सवालही खा. सुळे यांनी केला.
खा. सुळे पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादीचा कोणताही गट नसून शरद पवार यांचा एकच राष्ट्रवादी पक्ष आहे. माझ्याविरोधात कोणीतरी लढले पाहिजे, कोण लढेल त्याचे मी स्वागत करणार. पोस्टर लावण्यात गैर काय? सुनेत्रा पवार यांच्याशी माझी वैयक्तिक लढाई नाही. माझी कोणाशीही वैयक्तिक लढाई नाही. भाजपने आमच्या कुटूंबावर हल्ला केला. त्यामुळे आमच्यात नक्कीच काही तरी आहे.

अदृश्य शक्ती ही मराठी माणसाच्या मागे लागलेली आहे. त्यांची इच्छा आहे की राष्ट्रवादीने राष्ट्रवादीशी भांडण करावे. सेनेने सेनेशी करावे आणि दिल्लीच्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्राची मजा करावी. त्यांना महाराष्ट्राचे खच्चीकरण करायचे आहे. मुंबईत लोकसभेसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यामध्ये कोणत्याही नावांची चर्चा झाली नाही. इंडिया आघाडीतूनच उमेदवारांची निश्चिती होणार आहे, असेही खा. सुळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी खा.श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ.शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, राजकुमार पाटील, कविता म्हेत्रे, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे व पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button