Ayodhya : अयोध्येत होणार सर्वांत मोठी मशीद; बाबरचे नाव वगळले | पुढारी

Ayodhya : अयोध्येत होणार सर्वांत मोठी मशीद; बाबरचे नाव वगळले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी रामलल्लाचीच असल्याचा निर्वाळा देताना कारसेवकांनी उद्ध्वस्त केलेल्या बाबरी मशिदीसाठी याच अयोध्यानगरीत सर्वोच्च न्यायालयाने जागा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता ही मशीद पुन्हा उभारण्यात येणार असली तरी तिचे ‘बाबरी’ हे बदनाम नाव मात्र कायमचे पुसले जाणार आहे. नव्या मशिदीच्या उभारणीची घोषणा गुरुवारी मुंबईत झाली आणि या मशिदीचे नाव मुहम्मद बिन अब्दुल्ला असेल, असेही जाहीर करण्यात आले. (Ayodhya )

वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास कार्यक्रम हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मशिदीच्या या शिलान्यासाला उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अध्यक्ष जफर फारुकी साहब, मौलाना अब्दुल्लाह इबनुल कमर – अल – हुसैनी, मुफ्ती अजीजुर रेहमान फतेपुरी, सूफी लासानी पीर बिजापुरी, सुफी तरक्की पीर, सुफी फैहमी पीर, मौलाना अश शाह कादरी देवबंद, डॉ. हाबील खुराकीवाला, डॉ. आबिद सय्यद, मशिदीचे आर्किटेक इम्रान शेख यासह अनेक विद्वान, मौलाना या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या : 

 

या मशिदीचे संकल्पचित्रही प्रसिद्ध करण्यात आले. मशिदीच्या उभारणीच्या शुभारंभाचे प्रतीक म्हणून पहिली वीट सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झुफर अहमद फारुकी यांच्या हाती यावेळी सुपूर्द करण्यात आली. ही वीट अयोध्या नगरीला पाठिवण्यात येईल. सलामती पीर दर्गा ट्रस्ट आणि सुन्नी वक्फ बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने अयोध्येच्या धन्नीपूर मध्ये 5 एकरवर ‘मुहम्मद बिन अब्दुल्ला’ या नावाने ही मशीद बांधण्यात येणार असल्याचे हाजी अरफात शेख यांनी स्पष्ट केले. (Ayodhya )

सर्वोच्च न्यायालयाने फक्त या बांधकामासाठी 5 एकर जमीन दिली आहे. हा सर्व प्रकल्प 5 एकरात होणे शक्य नाही म्हणून स्वतःचे हलाल पैसे टाकून मुस्लिम समाजासाठी आणखी 6 एकर जमीनीची जागा खरेदी करणार असून तिला वक्फ करणार आहे. संपूर्ण 11 एकर मध्ये हाजी अरफात शेख, उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अध्यक्ष जफर फारुकी साहब, मौलाना अब्दुल्लाह इबनुल क़मर -अल – हुसैनी यांच्या निगराणीत हा प्रकल्प उभा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अशी असेल अयोध्येतील मशीद

  • मशिदीला प्रमुख 5 दरवाजे असतील. मशिदीचे मिनार 300 फुटांपेक्षाही जास्त उंच असतील.
  • ‘मुहम्मद बिन अब्दुल्ला’ मशिदीत 9 हजारांहून अधिक लोक एकाच वेळी एकत्र नमाज अदा करू शकतील.
  • मशिदीच्या पहिल्या मजल्यावर महिलांसाठी नमाज पठणाची स्वतंत्र व्यवस्था असेल. एकावेळी 4000 महिला नमाज पठण करू शकतील.
  • मशीद परिसरात अनेक शैक्षणिक संकुलेही उभारली जाणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र कॉलेजचीही स्थापना मशीद परिसरात केली जाईल.
  • देशामध्ये 2 ठिकाणी सर्वात मोठ्या कुराण शरीफची स्थापना केली जाणार असून महाराष्ट्रातील हजरत सूफी सलामती पीर देहू रोड, पुणे येथे हिरव्या रंगाचे कुराण शरीफ तर अयोध्येतील या नव्या मशिदीत भगव्या रंगाचे कुराण शरीफ स्थापन केले जाणार आहे. (Ayodhya )

हेही वाचा : 

Back to top button