Raj Thackeray On Toll Issue : टोलनाके बंद करा, अन्यथा जाळून टाकू: राज ठाकरे यांचा सरकारला इशारा | पुढारी

Raj Thackeray On Toll Issue : टोलनाके बंद करा, अन्यथा जाळून टाकू: राज ठाकरे यांचा सरकारला इशारा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा स्कॅम आहे. त्याची शहानिशा झालीच पाहिजे. चारचाकी आणि छोट्या गाड्यांना टोल नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मग, आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील. या वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (दि.९)  दिला. (Raj Thackeray On Toll Issue)

शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील टोलनाक्यांवर आक्रमक पवित्रा जाहीर केला. मनसेने २००९-१० साली टोलविरोधात आंदोलन छेडल्यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केल्याचे सांगत राज ठाकरे यांनी सर्व नेत्यांच्या टोलमाफीचे व्हिडीओच दाखविले. (Raj Thackeray On Toll Issue)

यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चित्रफिती ऎकविल्या. सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, अशी आश्वासने दिली. पण तरीही टोल बंद होत नाहीत. मधल्या काळात यांची सगळ्यांची सरकारे येऊन गेली पण आजपर्यंत टोल बंद झालेले नाही. राजकारणातल्या अनेक लोकांचे हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. यांच्याकडे दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला यातून पैसे जात असतात. याच्यामुळे टोल बंद करायला तयार नाहीत. तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत. फक्त याच लोकांचा फायदा होणार आहे. या लोकांनी थापा मारल्यानंतरही पुन्हा त्याच पक्षाला मतदान होते, हेच माझ्यासाठी अनाकलनीय असल्याचेही, राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना फक्त कमर्शियल गाड्यांनाच टोल आकारणी होत असल्याचे विधान केले होते. त्यावर, हे धादांत खोटे आहे. जर टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू, तर हे पैसे जातायत कुठे, टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. याबाबात मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांचे काय उत्तर येते ते बघू. अन्यथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे चारचाकी, तीन चाकी आणि दुचाकीला टोल नसेल, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील. या वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू. पुढे महाराष्ट्र सरकारला काय करायचंय ते सरकारनं करावं, अशा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Raj Thackeray On Toll Issue : तुमची भीती असणार आहे की, आमची दाखवू

आमच्या आंदोलनाच्या रेट्यानंतर अधिकृत आणि अनधिकृत असे ६७ टोल नाके बंद झाले. अन्यथा कुठल्याच सरकारच्या मनात टोल बंद करायची इच्छा नव्हती. पण, आमचा रेटा इतका होता की टोल बंद करावेच लागले. सरकार टोल नाही म्हणत असतानाही वसुली होत असेल, तर या टोलवाल्यांवर सरकारची भीती असणार आहे की, आमची दाखवू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा 

Back to top button