मुंबई: घाटकोपर येथील गुजराती भाषेतील पाटीची ठाकरे गटाकडून मोडतोड | पुढारी

मुंबई: घाटकोपर येथील गुजराती भाषेतील पाटीची ठाकरे गटाकडून मोडतोड

घाटकोपर, पुढारी वृत्तसेवा: घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेली गुजराती भाषेतील ‘मारु घाटकोपर’ नावाची पाटी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून काढली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या पाटीला ट्रोल करण्यात येत होते. या अगोदर मनसेने देखील ही पाटी काढण्याची मागणी केली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्री ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पाटीची तोडफोड केली.

सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक प्रविण छेडा यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून हे उद्यान बनविण्यात आले होते. याचा तीन बाजूला एकीकडे इंग्रजीत, एकीकडे मराठीत आणि दर्शनी भागात गुजराती भाषेत माझे घाटकोपर हे स्टेनलेस स्टील मधील पाटी लावण्यात आली होती. तेव्हापासून याला विरोध होऊ लागला होता. मनसेने अनेकदा पालिकेला ही पाटी काढण्यासाठी इशारा दिला होता.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पुन्हा याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊन टीका होऊ लागली. यामुळे मध्यरात्री ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या पाटीची मोडतोड केली. एवढेच नाही तर इथे माझे घाटकोपर असा मराठीत फ्लेक्स लावण्यात आला. याची माहिती मिळताच रात्री उशिरा पंतनगर पोलीस दाखल झाले. त्यांनी मोडतोड झालेली अक्षरे काढून टाकली. मात्र, या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल नसल्याने पोलिसांनी कारवाई केलेली नाही.

ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख सुरेश पाटील म्हणाले की मुलुंडमध्ये मराठी माणसाची केलेली गळचेपीमुळे शिवसैनिक रागात होता. त्यात न्यायालयाने मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. आणि मुळात मुंबई मराठी माणसांची आहे. त्यामुळे येथे मराठीमध्येच नावे असावीत म्हणून आमच्या शिवसैनिकांनी हे नाव हटवले आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे.

हेही वाचा 

Back to top button