

मुंबई : देशभरात 2021 ते 2025 या कालावधीत आयआयटीच्या 65 विद्यार्थ्यांनी जीवन संपविल्याची आकडेवारी माहिती हक्क अधिकारातून उघड झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सदर आत्महत्यांची आकडेवारी सतत वाढत असल्याचे दिसून येते. आयआयटी खरगपूर येथील जीवन संपविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 11 इतकी आहे. विशेष म्हणजे जीवनयात्रा संपविलेल्या 65 विद्यार्थ्यांपैकी 54 जण विद्यार्थी (पुरुष) आहेत.
आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंग यांनी माहिती हक्क अधिकाराखाली ही माहिती मिळवली आहे. ते आयआयटी विद्यार्थ्यांसाठी जागतीक मार्गदर्शन नेटवर्क चालवतात.फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबई आयआयटीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपविल्यानंतर हा विषय चिंतेचा झाला. यानंतर आयआयटी कौन्सिलने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला. आयआयटी विद्यार्थ्यांना गंभीर मानसिक आरोग्याच्या आव्हानांचा सामना करावा लागत असतो. गेल्या 20 वर्षांत विविध आयआयटी कँपस परिसरात किमान 150 विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. जीवनयात्रा संपविणे हा मानसिक आरोग्याच्या धोक्याचा एक दृश्य भाग आहे, असे सिंग यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक आत्महत्येमागे 20 पेक्षा जास्त घटना आत्महत्येच्या प्रयत्नांच्या आहेत. त्यामुळे खरे संकट खूपच मोठे आहेत. म्हणूनच सरकारने प्रमुख महाविद्यालयांतील आत्महत्यांना सार्वजनिक आरोग्याचा तातडीचा प्रश्न म्हणून हाताळायला हवे. अभ्यासाचा ताण, नोकरीबाबत अनिश्चितता, कौंटुंबिक आणि स्वत:च्या समस्या,भेदभाव व छळ आदी बाबींचा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येशी संबंध आहे, असे सिंग यांनी सांगितले.
जेव्हा या सर्व बाबींचा विद्यार्थी फटका सहन करत असतात तेव्हा आयआयटी लोकसंख्येच्या सुमारे एक पंचमांश उपेक्षित विद्यार्थी इतरांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट जीवनयात्रा संपविण्याचा भार सहन करतात, असेही मत सिंग यांनी नोंदवले आहे. बहुतेक जीवन संपविण्याची प्रकरणे सेमिस्टर परिक्षांच्या शेवटी शेवटी घडतात, तर शैक्षणिक सुट्टीच्या काळात त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आयआयटी विद्यार्थ्यांच्या 80 टक्के मृत्यूप्रकरण या कँपस परिसरातच होतात, असेही सिंग यांनी नमूद केले आहे.