

सिडको (नाशिक) : सिडको व अंबड भागांत गेल्या तीन दिवसांत एक शालेय आणि दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी रागावणे, कौटुंबिक कारणे, अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, व्यसन, प्रेमभंग आदी कारणांमुळे मुले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे.
जीवनयात्रा संपविण्याचे सर्वाधिक प्रमाण तरुणांत आढळून येत आहे. मुलगा जर ताणतणावात असेल तर पालक हे समाजाच्या भीतीने त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जात नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हाती अँड्रॉइड मोबाइल आले. काही विद्यार्थ्यांनी याचा चांगला उपयोग केला, तर काहींनी वाईट संगत, मोबाइलचा अतिवापर, व्यसनाधीनता, रागीटपणा यामुळे अगदी कमी वयात निराशेच्या गर्तेत असलेली मुले जीवनयात्रा संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन शिक्षण देणे गरजेचे आहे. अभ्यासाच्या तणावातून किंवा अपयशातूनदेखील काही विद्यार्थी नैराश्याकडे झुकतात. मुली भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात. मुलांच्या तुलनेत नैराश्याचे प्रमाण मुलींमध्ये अधिक आहे.
मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे
पहिली घटना अंबड औद्योगिक वसाहतीमधील रमाबाई आंबेडकर परिसरात घडली. येथे राहणाऱ्या युवराज मगरे (वय १३) या नववीच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. दुसरी घटना सिडकोतील विजयनगर येथे घडली. येथे राहणारी बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी मनीषा गवांदे (वय १९) हिने १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तिसरी घटना सह्याद्रीनगर येथे राहणाऱ्या ऋतिका नितीन इंगळे या महाविद्यालयीन तरुणीने १२ ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता राहत्या घरी बेडरूममध्ये पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला.