NCP Jayant Patil : जयंत पाटील यांच्या सरकारला लोकशाही दिनाच्या हटके शुभेच्छा; म्हणाले, पैशांवर मजा… | पुढारी

NCP Jayant Patil : जयंत पाटील यांच्या सरकारला लोकशाही दिनाच्या हटके शुभेच्छा; म्हणाले, पैशांवर मजा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकशाहीची संकल्पना आणि कल्पना स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. आज जागतिक लोकशाही दिन. लोकशाहीच्या महत्त्वाच्या भूमिकेला प्रोत्साहन देणे हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुख्य उद्देश ठेवून दरवर्षी हा दिवस १५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (शरद पवार गट) यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट लिहित सरकारवर निशाणा साधला आहे. (NCP Jayant Patil)

NCP Jayant Patil : लोकांच्या पैशांवर मजा….

जयंत पाटील यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट लिहित सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,” एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट. दुसरीकडे मात्र कांद्याला प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केलेले असताना, मालेगावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपये अनुदान जमा करत क्रूर थट्टा केली आहे. लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांनाही जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा! असं लिहित Democracyday हा हॅशटॅग दिला आहे.

जयंत पाटील यांनी सरकारला जागतिक लोकशाही दिनाच्या दिलेल्या हटके शुभेच्छा याची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. या शुभेच्छांना सरकार काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

संबधित बातम्या

लोकशाहीच्या व्याख्येचा अभ्यास नव्याने…

जयंत पाटील यांनी आपल्या ‘X’ खात्यावर आणखी एक पोस्ट करत असेही म्हंटले आहे की, “आज जागतिक लोकशाही दिन! लोकशाही म्हणजे केवळ लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य एवढ्यापुरते त्याचे महत्त्व नाही. लोकशाहीत चळवळींचे, आंदोलनांचे महत्त्व आहे. लोकशाहीत न्यायालय महत्त्वाचे आहे. न्यायालयावरचा विश्वास हा व्यवस्थेवरच्या विश्वासाला वृद्धिंगत करत असतो. नागरिक केंद्री कारभार होणे, त्यामध्ये संकुचित वृत्तीचा थारा टाळला जाणे हे महत्त्वाचे आहे. भेदनीतीच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक समाजभवना निर्माण करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या व्याख्येचा अभ्यास नव्याने करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये रुजावी आणि आपली लोकशाही चिरायू होवो याच सदिच्छा.”

म्हणून साजरा केला जातो लोकशाही दिन

दरवर्षी १५ सप्टेंबरला जागतिक ‘लोकशाही दिन’ साजरा केला जातो. हा दिवस २००७ पासून साजरा केला जातो. लोकशाहीच्या महत्त्वाच्या भूमिकेला प्रोत्साहन देणे हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाद्वारे, समानता, स्वातंत्र्य आणि सर्व नागरिकांचे हक्क यासारख्या लोकशाहीतील मूलभूत घटकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची लोकांना जाणीव करून दिली जाते. हा दिवस जागतिक स्तरावर सर्व लोकांना लोकशाहीचे महत्त्व समजावून सांगण्याची आणि प्रचार करण्याची संधी प्रदान करतो.

हेही वाचा 

Back to top button