Cristiano Ronaldo : रोनाल्डोला डच्चू, बॅलोन डी’ओर पुरस्कार यादीतून खेळाडूचे नाव गायब

Cristiano Ronaldo : रोनाल्डोला डच्चू, बॅलोन डी’ओर पुरस्कार यादीतून खेळाडूचे नाव गायब

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित पुरस्कार बॅलोन डी'ओरसाठी 30 संभाव्य नावांची नुकतीच घोषणा करण्यात आली. मात्र, या घोषणेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर या यादीतून पोर्तुगीज फुटबॉलपटूचे नाव गायब झाले असल्याचे समोर आले असून 2003 नंतर प्रथमच बॅलोन डी'ओरच्या नामांकन यादीत रोनाल्डोला स्थान मिळू शकलेले नाही. यंदाच्या बॅलोन डी'ओर नामांकन यादीत किलियन एमबाप्पे, लिओनेल मेस्सी आणि एर्लिंग हॉलंड या स्टार खेळाडूंनी या आपले स्थान निश्चित केले आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 30 ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये होईल.

बॅलोन डी'ओर वर रोनाल्डोची पाच वेळा मोहोर

रोनाल्डो हा सध्या सौदी अरेबियाच्या अल नासेर क्लबकडून खेळतो. त्याने बॅलोन डी'ओर या प्रतिष्ठीत पुरस्कारावर पाच वेळा नाव कोरले आहे. मँचेस्टर युनायटेड संघाचा भाग असताना 2008 मध्ये तोनाल्डोने पहिल्यांदा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला होता. 2004 पासून त्याला सलग वीस वर्षे नामांकन मिळाले आहे. यादरम्यान त्याने 2013, 2014, 2016 आणि 2017 मध्ये हा पुरस्कार पटकावला.

मेस्सीने बॅलोन डी'ओर सात वेळा जिंकला

2022 मध्ये बॅलोन डी'ओर पुरस्काराच्या यादीत मेस्सीचे नाव नव्हते. त्याने हा पुरस्कार 7 वेळा जिंकला आहे. 2009 मध्ये मेस्सीने पहिल्यांदा या पुरस्कारावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्येही त्याला बॅलोन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अर्जेंटिनाला विश्वचषक विजेतेपद मिळवून देणारा मेस्सी हा सध्या अमेरिकन फुटबॉल क्लब इंटर मियामीकडून खेळत आहे. यंदा जाहीर झालेल्या 30 पुरुष खेळाडूंच्या यादीत त्याला एर्लिंग हॉलंड आणि किलियन एमबाप्पे यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. गतवर्षीचा विजेता करीम बेन्झेमाही या शर्यतीत आहे.

बॅलोन डी'ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले प्रमुख खेळाडू

लिओनेल मेस्सी (इंटर मियामी)
व्हिक्टर ओसिमहेन (नापोली)
मार्टिन ओडेगार्ड (अर्सेनल), आरोन रॅम्सडेल (अर्सेनल),
एर्लिंग हालांड (मॅन्चेस्टर सिटी), ज्युलियन अल्वारेझ (मॅन्चेस्टर सिटी), रुबेन डायझ (मॅन्चेस्टर सिटी), जोस्को गार्डिओल (मॅन्चेस्टर सिटी), केविन डी ब्रुयन (मॅन्चेस्टर सिटी), बर्नार्डो सिल्वा (मॅन्चेस्टर सिटी)
मोहम्मद सलाह (लिव्हरपूल)
हॅरी केन(बायर्न म्युनिक), जमाल मुसियाला (बायर्न म्युनिक), किम मिंज-जे (बायर्न म्युनिक),
व्हिनिसियस ज्युनियर (रिअल माद्रिद), ज्युड बेलिंगहॅम (रिअल माद्रिद), लुका मॉड्रिक (रिअल माद्रिद)

महिलांमध्ये स्पेनच्या खेळाडूंचा दबदबा

विश्वचषक विजेत्या स्पेनच्या सहा महिलांच्या खेळाडूंना यादीत स्थान मिळाले आहे. यामध्ये आयताना बोनामतीचा समावेश आहे. तिला गेल्या आठवड्यात युईएफए (UEFA) महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले होते.

बॅलोन डी'ओर पुरस्कार 1956 पासून सुरू

'फ्रान्स फुटबॉल' या फ्रेंच फुटबॉल मॅगझिनद्वारे 1956 पासून दरवर्षी पुरुष फुटबॉलपटूंना बॅलोन डी'ओर हा पुरस्कार दिला जातो. क्लब आणि राष्ट्रीय संघाच्या वतीने एका वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्काराने सन्मानित केले जाते. 2018 पासून महिला खेळाडूंना सन्मानित करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे 2020 हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news