Opposition Meeting in Mumbai | लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीची रणनिती ठरली, घेतला ‘हा’ ठराव | पुढारी

Opposition Meeting in Mumbai | लोकसभा निवडणुकीसाठी 'इंडिया' आघाडीची रणनिती ठरली, घेतला 'हा' ठराव

मुंबई, पुढारी ऑनलाईन : विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ने मुंबईतील बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शक्य तितक्या जागा एकत्र लढविण्याचा ठराव घेतला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया समन्वयाने ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरात लवकर ती पूर्ण केली जाईल, असा ठराव विरोधी पक्षांच्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) आघाडीने घेतला आहे. (Opposition Meeting in Mumbai)

देशातील विविध ठिकाणी जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि लोकहिताचे मुद्दे घेऊन इंडिया आघाडी लवकरच रॅलीचे आयोजन करेल. जुडेगा भारत, जितेगा भारत ही मोहीम देशभर राबवण्याचा निर्णय ‘इंडिया’ने घेतला आहे.

मुंबईत ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे एम के स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, ओमर अब्दुल्ला आणि इतर नेते उपस्थित राहिले आहेत.

या बैठकीबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या लोगोचं आज अनावरण होणार नाही. लोगोचं अनावरण पुढे ढकललं आहे. नवीन घटक पक्षांसोबत लोगोबाबत चर्चा करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. (INDIA Alliance Meeting Mumbai) इंडिया आघाडीची पुढची बैठक तामिळनाडूत होणार असल्याचीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. ‘इंडिया’च्या घटकपक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी रात्री ‘डिनर डिप्लोमसी’ केली. यावेळी झालेल्या प्राथमिक चर्चेत काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ आघाडीचे संयोजक करावे, असे सुचविण्यात आले. काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख पक्ष आहे. ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व हे काँग्रेसकडे असले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. मोदी यांचा पराभव करायचा असेल, तर काँग्रेस हा मोदी यांच्याविरोधात प्रमुख चेहरा असला पाहिजे, तर मतदार ‘इंडिया’ आघाडीला गांभीर्याने घेतील, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

 हे ही वाचा :

Back to top button