ई-चलन तत्काळ भरा, नाहीतर लायसन्स होईल रद्द | पुढारी

ई-चलन तत्काळ भरा, नाहीतर लायसन्स होईल रद्द

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील वाहनचालकांनो, तुमच्या गाडीवर जर कोणतेही ई-चलन शिल्लक असेल तर ते तत्काळ भरा, नाहीतर तुमचे लायसन्स रद्द किंवा निलंबित होईल. या वर्षी आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी २३२ कोटी रुपयांची ३२ लाख ५२ हजार ई- चलन जारी केले आहेत. परंतु यापैकी सुमारे ७१ टक्के ई-चलन अद्याप भरलेली नाहीत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. वाहनचालकांना दंडाकरिता ई- चलन जारी केले जाते. काही चालक तत्काळ ई-चलनाद्वारे आकारलेला दंड भरतात, तर काही चालक कित्येक दिवस, महिने ई-चलन भरत नाहीत. अशा चालकांना वाहतूक पोलिसांद्वारे नोटीस पाठविली जाते.

गेल्या काही वर्षांत ज्या वाहन चालकांनी ई-चलन भरले नव्हते. त्यांना वाहतूक पोलिसांनी प्री-लिटिगेशन नोटीस पाठवली होती. त्यामुळे तब्बल ४२० कोटी रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला. जे चालक वाहतुकीच्या नियमांचे तीनपेक्षा जास्त वेळा उल्लंघन करतात आणि ज्यांचे ई-चलन प्रलंबित आहे, अशा वाहनचालकांचे लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे पाठवला आहे.

लायसन्स जप्त केल्यानंतर ई-चलन भरण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी

लायसन्स जप्त केल्यानंतर वाहनचालकांना ई -चलनची रक्कम भरण्यासाठी १५ दिवसांचा कालवधी मिळेल. या कालावधीत त्या चालकाला तात्पुरता परवाना मिळेल. परंतु जर त्याने या कालावधीत ई-चलन भरले नाही, तर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. २०२२मध्ये ३६५ कोटी रुपयांची एकूण ५१ लाख ३४ हजार ई-चलन जारी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ३५ टक्के रक्कम चालकांनी भरली आहे.

हेही वाचा : 

Back to top button