

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जे बोलतात ते कधीच करत नाहीत. सध्याच्या राजकारणामागे पवारांचा मोठा गेम आहे. कदाचित ऑलिम्पिकही असू शकतो. अजित पवार महायुतीकडून लढतील. शरद पवार महाविकास आघाडीकडून लढतील आणि पुढे दोघांचा संगम करून ते एक महासागरच बनतील, असा अंदाज आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अजित पवार आमचेच नेते, असे वक्तव्य शुक्रवारी सकाळी पवारांनी (Maharashtra Politics) केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता कडू यांनी हे वक्तव्य केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमध्ये नेमका कोणता फरक आहे, हे सांगताना बच्चू कडू म्हणाले, शिवसेना हा गावगाड्यातील पक्ष आहे. त्यांच्याकडे अतिशय सामान्य पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचे जाळे आहे. शिवसेना फुटली त्यावेळी दोन्ही गटांचे (ठाकरे व शिंदे) कार्यकर्ते रस्त्यावर येऊन रडत होते; पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रात असे चित्र पाहायला मिळाले नाही. राष्ट्रवादीतील भांडण उद्योगपतीच्या घरातील भांडणासारखे आहे. ते कधीच बाहेर येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस उद्योगपतींचाच पक्ष (Maharashtra Politics) आहे.
'बाप बापच असतो,' असे फलक कोल्हापुरात लागले आहेत, यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, बापाला पूर्वीसारखा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम कोठे राहिले आहे. आता कार्यकर्त्यांना बाप मेल्याचे दुःख नाही; पण नेता मेल्याचे दुख होते. परंतु, जनतेचा बाप कोणी होऊ शकत (Maharashtra Politics) नाही.
शेतकऱ्यांनी आपली मर्दानकी आता मतदानातून दाखविण्याची गरज आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना त्रास होणे मी समजू शकतो; परंतु भाजप सरकारच्या काळातही होत असेल तर ते चुकीचेच आहे. लोकांसाठी सरकारवर टीका करणे काही चुकीचे नाही. चुकीच्या गोष्टीबद्दल आम्ही बोलतच राहणार.