

मुंबई : पवन होन्याळकर
पटसंख्या आणि संचमान्यतेतील जाचक अटींमुळे गेल्या चार वर्षांत मराठी माध्यमाच्या तब्बल 624 शाळा कमी झाल्या असून याच काळात इंग्रजी माध्यमाच्या मात्र 426 नव्या शाळांची भर पडली आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस धोरण न राबवल्यास ही घसरण आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या पाचही विभागांत मराठी शाळांवर गंडांतर आले आहे. 255 मराठी शाळा बंद झाल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्वतः दिली आहे.
यु-डायसच्या आकडेवारीनुसार 2022-23 मध्ये असलेल्या 86 हजार 157 असलेल्या मराठी शाळा 2025-26 या शैक्षणिक वर्षात 85 हजार 533 वर पोहचल्या. याउलट इंग्रजी माध्यमाचा शाळांचा प्रभाव शहराबरोबरच ग्रामीण भागात वाढतच चालला आहे.2022-23 मध्ये 14 हजार 810 असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या 2025-26 मध्ये 15 हजार 236 इतकी पोहोचली आहे.
राज्यात एकूण शाळांत सुमारे 2 कोटी 15 लाख विद्यार्थी शिकत आहेत. 2024-25 च्या तुलनेत 2025-26 मध्ये राज्यातील मराठी माध्यमाच्या 188 शाळा घटल्या, तर इंग्रजी माध्यमाच्या 124 शाळांची वाढ झाली. गुजराती माध्यमाच्या मात्र 150 शाळा कमी झाल्या. कन्नड माध्यमात 139 शाळांची वाढ झाली.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून अनेक पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळा खुणावू लागल्या आहेत. इंग्रजी शाळांची संख्या वाढली असून 3 लाखांवर विद्यार्थी वाढल्याचे दिसत आहे. त्या तुलनेत मराठी शाळांतील मात्र दीड लाख विद्यार्थी कमी झाले आहेत.