Child deaths : राज्यात तीन वर्षांत 34 हजार बालमृत्यू

मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक कुपोषित बालके
child deaths
राज्यात तीन वर्षांत 34 हजार बालमृत्यूpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : बालमृत्यू कमी झाल्याचा दावा करणाऱ्या महायुती सरकारच्या कार्यकाळात गेल्या अडीच वर्षांत पाच वर्षांखालील तब्बल 34 हजार 325 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मुदतपूर्व जन्म, कमी वजन, जंतुसंसर्ग, न्यूमोनियामुळे हे मृत्यू झाल्याची कारणमीमांसा राज्य सरकारने एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत राज्यातील कुपोषित बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात तारांकित प्रश्न मांडला होता. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना, पोषण आहार योजना आणि आरोग्य तपासणी कार्यक्रम राबवला जात असताना योजनेतील त्रुटीमुळे कुपोषण दूर करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

child deaths
Air travel refund rules : आता विनाभुर्दंड विमान तिकीट रद्द होणार

या प्रश्नाच्या लेखी उत्तरात महिला व बालकल्याण विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी मागील तीन वर्षांत राज्यात कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात म्हणजेच 2023-24, 2024-25 आणि 2025च्या सप्टेंबर अखेर पाच वर्षांखालील 34 हजार 325 बालमृत्यू झाल्याची कबूली दिली आहे.

विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही कुपोषित बालक असल्याचे समोर आले आहे. मुंबई शहर विभागात 274 तीव्र कुपोषित तर 1334 मध्यम कुपोषित अशी एकूण 1648 बालके आढळली आहेत. उपनगरांमध्ये 682 तीव्र कुपोषित आणि 5666 मध्यम अशी एकूण 6351 बालके कुपोषित असल्याचे सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे 5109, धुळे 4339, जळगाव 4693, नागपूर 3533, नांदेड 4095, नंदुरबार 7454, नाशिक 5366, पुणे 4423 आणि ठाणे येथे 4222 मध्यम कुपोषित बालके आढळली असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.

child deaths
Mumbai AQI : मुंबईचा सरासरी एक्यूआय शंभरच्या खाली आला

कुपोषण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना

  • पूरक पोषण आहार : 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ‌‘टेक होम रेशन‌’ दिले जाते. 3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रांवर गरम ताजा आहार पुरवला जातो.

  • नियमित आरोग्य तपासणी : अंगणवाडी सेविकांमार्फत बालकांची उंची व वजन, तसेच गरोदर मातांचे वजन घेऊन त्यांच्या पोषण स्थितीवर लक्ष ठेवले जाते.

  • भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातील गरोदर महिला आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार, 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना आठवड्यातून चार दिवस अंडी, केळी, शाकाहारी बालकांना दररोज 2 केळी आणि मांसाहारी बालकांसाठी 1 अंडे देण्यात येते.

  • विशेष उपक्रम : राज्यातील अति तीव्र कुपोषित बालकांना दिवसातून तीन वेळा ‌‘एनर्जी डेन्स न्यूट्रिशिअस फूड‌’ पुरवले जाते. आवश्यकतेनुसार, आरोग्य विभागामार्फत त्यांना औषधोपचारही दिले जातात.

  • - ‌‘सुवर्णमयी 1000 दिवस‌’ अभियान : राज्यातील नागरी व ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी, बाळाच्या आयुष्यातील पहिले सुवर्णमयी 1000 दिवस या महत्त्वाच्या टप्प्याविषयी व्यापक जनजागृती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news