आर्थिक गुन्हे शाखेकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांची सहा तास चाैकशी | पुढारी

आर्थिक गुन्हे शाखेकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांची सहा तास चाैकशी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध कंत्राटांमधील कथित घोटाळ्यांचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांची सहा तास कसून चाैकशी केली. चव्हाण यांची खिचडी वाटपातील कथित घोटाळ्याप्रकरणी प्राथमिक चाैकशी करुन त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

कोरोना काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला कोविड सेंटर उभारणी, डाॅक्टर आणि कर्मचारी पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, औषध खरेदी अशी कोट्यावधी रुपयांची कंत्राटे देऊन करण्यात आलेल्या घोटाळ्यासह अन्य घोटाळा प्रकरणांची प्राथमिक चाैकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. कोविड सेंटर कंत्राट घोटाळा प्रकरण आर्थिक गुन्हेशाखेने गेल्या महिन्यात सुरज चव्हाण यांची पाच तास कसून चाैकशी केली होती. त्यानंतर त्यांना कथित खिचडी वाटप घोटाळाप्रकरणात चाैकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यानुसार मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास चव्हाण हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हेशाखेच्या कार्यालयात हजर झाले. आर्थिक गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांची त्यांची सहा तास कसून चाैकशी केली.

कोरोना काळात स्थलांतरीत परप्रांतियांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन त्याचे वाटप करण्यात आले. मुंबई महानगर पालिकेने याचे कंत्राट दिले होते. यात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हेशाखेने पालिकेकडून संबंधित कंत्राटांच्या ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे चव्हाण यांच्याकडे चाैकशी केली आहे. चव्हाण यांनी अनेक कत्राटांमध्ये मध्यस्थांची भुमिका बजावल्याचा संशय असल्याने तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक मित्र सुजीत पाटकर यांचा ताबा घेत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर आता आर्थिक गुन्हेशाखेने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्याकडे चाैकशी सुरु केल्याने ठाकरे गटातील पदाधिकारी, नेत्यांच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

.हेही वाचा 

जामखेड : जमिनीच्या वादातून कुर्‍हाडीने हल्ला ; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, भुसावळात 50 लाखांचा गुटखा जप्त

Onion News : सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Back to top button