मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या | पुढारी

मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : रिक्षातून प्रवास करत असलेल्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पथकाने घाटकोपर परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. बनश्याम सोनी असे या आरोपी रिक्षा चालकाचे नाव असून त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई हिरानंदानी ते मोरारजी नगर दरम्यान १९ ऑगस्टच्या दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. पीडित विद्यार्थीनी खासगी शिकवणी आटोपून सोनी याच्या रिक्षातून घरी परतत होती. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरुन जात असताना रिक्षा चालकाने मुलीसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. मुलीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा वेगात असल्याने ती हतबल होती. अखेर घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी मुलीला सोबत घेऊन पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पवई पोलिसांनी विनयभंगाच्या भादंवि कलमासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

गुन्ह्याचे गांर्भिय लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे प्रभारी पोनि दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश तोडकर यांच्या पथकाने गुन्ह्यातील तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपी रिक्षाचालक सोनी याला घाटकोपरमधून ताब्यात घेतले. आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच गुन्हेशाखेने त्याला पवई पोलिसांच्या हवाली केले आहे. आरोपी सोनी हा दिवा येथील रहिवासी असून त्याच्याकडे चाैकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button