नगर: चंदनाची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; अकोले वनविभागाची कारवाई | पुढारी

नगर: चंदनाची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; अकोले वनविभागाची कारवाई

अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुळा खोऱ्यातील कळंब येथे वनविभागाच्या हद्दीतील चंदनाची झाडे तोडून तस्करी करणाऱ्या आरोपींची वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चंदनाचा गाभा ताब्यात घेतला आहे.

कळंब परिसरातील वनविभागाच्या हद्दीत चंदन तस्करी सुरू असल्याची माहिती अकोले वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. यावेळी स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ कळंब येथील वनविभागाच्या हद्दीत जाऊन चंदनाची झाडे तोडणाऱ्या गोविंद गुलाब पिंपळे आणि काजल गोविंद पिंपळे या दाम्पत्याला पाहिले. मात्र, गोविंद पिंपळे हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन पसार झाला. वनविभागाने काजल पिंपळे यांना ताब्यात घेतले आहे. नंतर परिसरात पाहणी केली असता अधिकाऱ्यांना चंदनाची चार झाडे तोडली असल्याचे दिसून आले. तसेच घटनास्थळी चंदनाच्या आतील दहा हजार रुपये किंमतीचा गाभा ही वनविभागाने ताब्यात घेतला. गोविंद पिंपळे हा आरोपी घटनास्थळाहून आपल्या पत्नीला जागेवरच सोडून पसार झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अकोलेचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला.

अकोले वनविभागाने गोविंद गुलाब पिंपळे, काजल गोविंद पिंपळे (दोघेही रा. कळंब) यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९९७ चे कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप वन संरक्षक अहमदनगर सुवर्णा माने, सहायक वन संरक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोलेचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी केली. त्यांना वनपाल एस.बी. शिर्के, विठ्ठल पारधी, वनरक्षक सुनील कुक्कुडवाल, सुनिता टेंम्बरे, वन कर्मचारी बाळासाहेब हांडे, गोविंद भोर, सागर गोंदके, शिवाजी लांडगे, निखिल गवांदे, रंगनाथ कडू, माधव भांगरे यांनी मदत केली.

अकोले तालुक्यात वनविभागाच्या हद्दीत वन्य जीवांची तस्करी, वृक्षतोड, वन्यप्राण्यांच्या शिकारी असे प्रकार कुठे घडत असल्यास नागरिकांनी न घाबरता अकोले वनविभागाशी संपर्क साधावा. दोषींवर वन कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.
– प्रदिप कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी, अकोले

हेही वाचा:

श्रीरामपूर : आयोगामुळे देशीगायी संवर्धनास मदत होणार : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

श्रीरामपूर : रंधा धबधब्यामध्ये बुडून तरूणाचा मृत्यू

नेवाशात ‘जनसेवेचा यज्ञ’ चालूच ठेवणार : आमदार शंकरराव गडाख

 

Back to top button