सर्वांना परवडणार्‍या दरात आरोग्यसुविधा : पंतप्रधान मोदी | पुढारी

सर्वांना परवडणार्‍या दरात आरोग्यसुविधा : पंतप्रधान मोदी

गांधीनगर; वृत्तसंस्था : परवडणार्‍या किमतीमध्ये सर्वांना आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा मानस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. गांधीनगरमध्ये जी-20 देशांतील आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेला त्यांनी दूरद़ृश्ययप्रणालीद्वारे संबोधित केले.

ते म्हणाले की, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे रास्त दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष्य आहे. कोव्हिड 19 सारख्या आरोग्य आणीबाणीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. महामारीसारख्या विषाणुंचा प्रतिकार करण्यासाठी सदैव तत्पर राहण्यासाठी आरोग्य सेवांचे जाळे सर्वदूर विणण्याची गरज आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण आरोग्य योजनांसाठी काम केले पाहिजे. जागतिक स्तरावरच सर्वसमावेश यंत्रणा प्रस्थापित झाल्यास सर्वच देश आरोग्य सेवांसाठी एकाच व्यासपीठावर येतील, असेही त्यांनी सांगितले. 2030 पर्यंत भारत टीबीमुक्त (क्षयरोग) करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘आयुष्मान’चे अभिनंदन

आयुष्मान भारत या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून भारताने जगभरात आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे (हू) प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयसेस यांनी भारताचे अभिनंदन केले. या योजनेच्या माध्यमातून कोव्हिड-19 च्या काळात भारताने देशात दूरवर टेलिमेडिसनची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दलही त्यांनी आभार मानले. भारताच्या डिजिटल हेल्थ सिस्टीमच्या धर्तीवर जागतिक आरोग्य संघटनेमध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Back to top button