पुढारी ऑनलाईन डेस्क : "ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे", अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Hari Narke Passes away )
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि वक्ते हरी रामचंद्र नरके यांचे आज निधन झाले. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे. महाराष्ट्राच्या विचार व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा.हरी नरके यांनी आपली अशी ओळख निर्माण केली.
महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन याचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली.वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास – संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे. प्रा.हरी नरके यांच्या आत्म्यास सद्गती लाभो तसेच त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याकरता शक्ती मिळो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
हेही वाचा