पुढारी ऑनलाईन डेस्क : भव्यदिव्य आणि कलात्मक सेट उभारण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन जीनव संपवले. त्यांनी खालापूर येथे उभारलेल्या एन. डी. स्टुडिओतच शेवट केल्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, नितीन देसाई यांचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यामध्ये त्यांचा गळफास घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
नितीन देसाई यांनी हिंदी सिनेसृष्टी क्षेत्रालाही टक्कर देईल, असा स्टुडिओ 2005 मध्ये उभारला होता. त्यासाठी त्यांनी कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. ते ठराविक मुदतीत न फेडल्यामुळे स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढवली होती. त्यातूनच देसाई यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
कलिना (मुंबई) स्थित एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने स्टुडिओच्या मालमत्ता जप्तीसाठी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे परवानगी मागितली होती. हा धक्का सहन न झाल्याने नितीन देसाई यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ज्या स्टुडिओत त्यांनी कलासंवर्धनाची मोठी स्वप्ने पहिली, त्याच स्टुडिओत त्यांनी गळफास घेत जगाचा निरोप घेतला.
देसाई यांनी 'सीएफएम' या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2016 आणि 2018 मध्ये यासंदर्भातील करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी आपल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5.89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर 'सीएफएम' या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाती एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. देसाई यांच्याकडून कर्जाची वसुली होत नव्हती. 180 कोटींच्या कर्जाची रक्कम 3 मे 2022 पर्यंत व्याजासह सुमारे 249 कोटी रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला होता. मात्र, देसाई यांच्याकडून कर्जाची रक्कम भरली गेली नाही. अखेर कर्जवसुलीसाठी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेने दोन महिन्यांपूर्वी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे परवानगी मागणारा अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर महिन्याभरापासून नितीन देसाई हे तणावात होते. त्यातच मोठ्या संख्येने चित्रपटनिर्मिती होत असतानाही शूटिंगसाठी एन. डी. स्टुडिओला मागणी नव्हती. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत गेल्याने ते नैराश्यात होते. या नैराश्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतला.
नितीन देसाई हे कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य एन. डी. स्टुडिओ त्यांनी 2005 मध्ये सुरू केला. अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण या स्टुडिओत झाले आहे. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा-अकबर', 'हम दिल दे चुके सनम' अशा भव्य सिनेमांचे कला दिग्दर्शन त्यांनी केले. 'बालगंधर्व' या मराठी सिनेमाचे कला दिग्दर्शनही त्यांनी केले. 'देवदास', 'खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. अशा ख्यातनाम कलावंताची झालेली दुःखद एक्झिट सर्वांना चटका लावून गेली.
स्टुडिओत मिळालेल्या देसाई यांच्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये चार ऑडिओ क्लिप मिळाल्या आहेत. यासंदर्भात रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधला असता, या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांच्या अहवालानंतरच याबाबत सांगता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :