वीजबिल रोखीने भरण्यावर १ ऑगस्टपासून कमाल मर्यादा | पुढारी

वीजबिल रोखीने भरण्यावर १ ऑगस्टपासून कमाल मर्यादा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा राहणार आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादित केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबिल भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.

महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेत स्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येऊ शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व यूपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो.

तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त महावितरणने रु.५,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करुन देण्यात आ- लेला आहे.

Back to top button