

कांदिवली: नॅशनल पार्कातील तीन बिबट्यांची शिकार करणाऱ्या सहा जणांना डहाणू वनविभागाने अटक केली असून त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिकारीच्या घटना 5 ते 6 महिन्यांपूर्वीची असल्याचा अंदाज आहे.
विशाल वामन वरठा (रा. वरठा पाडा ता. जि. ठाणे), मयूर प्रमोद म्हात्रे (राहणार- जूचंद्र ता.वसई, जि. पालघर), अनिल सीताराम धावडे, हर्षद चंदर जाधव, दिनेश पागेरा, संतोष गोविंद घोश (सर्व रा. माशाचा पाडा, ता. जि. ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बिबट्याची हाडे, तारेचे फास व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आरोपींनी बिबट्याचे शव मिळाल्याचे व त्यांचे दात व इतर अवयव त्यांनी काढून घेतल्याचे मान्य केले आहे. वनविभागाच्या पाहणीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चेना पश्चिम नियतक्षेत्रात 1, काशी नियतक्षेत्रात 1 अशा एकूण 2 बिबट्यांची शिकार झाल्याचे निश्चित झाले आहे, तर घोडबंदर नियतक्षेत्रात एका ठिकाणी एक हाड व काही केस मिळाले असून ते बिबट्याचे आहेत, तसेच त्याच किंवा वेगळ्या बिबट्याचे आहेत याबाबत तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वन परिक्षेत्र अधिकारी भाताणे, डहाणू वन विभाग व त्यांच्या पथकाने खरेदीदार होऊन बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणात दोन आरापींना बिबट्याच्या कातड्यासह 29 मार्च रोजी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर गुन्हा नोंदवत केलेल्या अधिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी सर्व आरोपींना वसईतील प्रथम श्रेणी न्यायालयसमोर हजर केले असता यातील पाच आरोपींची रवानगी नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
राष्ट्रीय उद्यानात अतिक्रमण करून शिकार
यातील मुख्य व प्रत्यक्ष शिकार केलेले आरोपी हर्षद चंदर जाधव, दिनेश पागेरा आणि संतोष गोविंद घोशे असून ते आदिवासी समाजाचे असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात माशाचा पाडा येथे अतिक्रमण करून राहात होते. तसेच आरोपी हर्षद चंदर जाधव आणि संतोष गोविंद घोशे यांनी शेतीसाठी अतिक्रमण व वनहक्क अधिनियम अंतर्गत दावा दाखल केलेला आहे.
बिबट्यांचे अवयव खुल्या बाजारात विकून पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी रानडुकरांच्या शिकारीसाठी लावलेले फासे किंवा इतर पारंपरिक पद्धतीने शिकार केल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी दिली.