Ganeshotsav 2023 : यंदा १९ दिवस उशिराने गणपती बाप्पांचे आगमन | पुढारी

Ganeshotsav 2023 : यंदा १९ दिवस उशिराने गणपती बाप्पांचे आगमन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : यंदा अधिक मासामुळे गणपती बाप्पांचे आगमन 19 दिवस उशिराने होणार आहे. गतवर्षी गणपती बाप्पांचे आगमन 31 ऑगस्टला झाले होते. यावर्षी बाप्पा घरोघरी 19 सप्टेंबरला विराजमान होणार आहेत. तर अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर रोजी आहे.

यंदा मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. तरीही कुंभारवाड्यातील मूतिर्र्कार जोमाने कामाला लागले असून लाखो मूर्ती तयार करण्यात दिवस-रात्र व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते. मागील वर्षी 31 ऑगस्ट 2022 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. तर 9 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला होता. मात्र यंदा 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.

यावर्षी गणरायाचा मुक्काम 10 दिवसांचा असणार आहे. गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अजून 64 दिवस बाकी आहेत. मूर्तिकारांनी मार्च महिन्यापासूनच मूर्ती घडविण्याची लगबग सुरू केली आहे. जसजसे दिवस जात आहे, तसतसे मूर्ती बनविण्याचा वेग वाढत आहे. सध्या मूर्ती बनविणे व त्याचे फिनिशिंग करणे सुरू आहे. 50 दिवसांनंतर रंगरंगोटीचे काम सुरू होईल.

गणेशाची साकारताहेत वेगवेगळी रूपे

मूर्तिकार सदैव गणपती बाप्पा विविध रूपात साकारण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा अधिक मासामुळे जास्तीचा वेळ बाप्पांच्या नवनवीन स्वरूपातील मूर्ती घडविण्यासाठी मिळाला असून या संधीचा फायदा घेत मूर्तिकार नवीन मूर्ती घडवत आहेत. भाविकांना नवीन मूर्ती यावेळी दिसणार आहेत.

का होणार उशिरा आगमन?

यंदा अधिक मास आला आहे. 18 जुलैपासून अधिक मासाला सुरुवात होईल व 16 ऑगस्टला अधिक मासची सांगता होईल.
यामुळे गणरायाचे आगमन 19 दिवस लांबले आहे.

Back to top button