Monsoon update | राज्यातील ‘या’ भागांत अतिमुसळधारेचा इशारा, पुराची शक्यता | पुढारी

Monsoon update | राज्यातील 'या' भागांत अतिमुसळधारेचा इशारा, पुराची शक्यता

पुढारी ऑनलाईन : पुढील ५ दिवसांत गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर (Ghat areas of Madhya Maharashtra) अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे रस्ते पाण्याखाली जाऊ शकतात. तसेच नद्यांना पूर येऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच गुजरातमधील काही भागांत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत गोवा (Goa), कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला आहे. तर गुजरातच्या काही भागांत तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत रत्नागिरीतील मंडणगड आणि रायगडमधील माथेरान येथे प्रत्येकी १९ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेण, खालापूर, कर्जत येथेही मुसळधार पाऊस झाला आहे. नाशिकमध्येही पावसाचा जोर अधिक राहिला आहे.

आज गुजरात आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून त्यानंतर तो कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भात ५ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. देशातील बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबचा उर्वरित भाग मान्सूनने व्यापण्यासाठी पुढील २ दिवसांत परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तराखंडमधील काही भागात १ ते ५ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातही पावसाचा जोर राहणार आहे.

हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. “२ जुलै पासून दक्षिण द्वीपकल्पीय भारतात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागांवर आणि शेजारच्या भागावर चक्रीवादळाचे परिवलन आहे.” असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

केरळ आणि कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD च्या माहितीनुसार, ३ आणि ४ जुलै रोजी कर्नाटकचा किनारी भाग आणि केरळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

Back to top button