जूनमध्ये सरासरीच्या केवळ 25 टक्केच पाऊस | पुढारी

जूनमध्ये सरासरीच्या केवळ 25 टक्केच पाऊस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या केवळ 25 टक्केच पाऊस झाला. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी केवळ नऊ दिवसच पाऊस झाला. जुलै महिन्यात मात्र, पाऊस सरासरी गाठणार असल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले. संपूर्ण जून कोरडा जातो की काय, अशी परिस्थिती असताना अखेरच्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली. काही भागात दमदार पाऊस झाला. तर काही भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

जूनमध्ये सरासरीपेक्षा 74.2 टक्के कमी पाऊस

जून महिन्यात जिल्ह्यात 362.9 मि.मी.इतका पाऊस होतो. यावर्षी केवळ 93.5 मि.मी.पाऊस झाला. तो सरासरी 25.8 मि.मी. इतका राहिला. सरासरीपेक्षा 74.2 टक्के कमी पाऊस झाला आहे.

केवळ नऊच दिवस पाऊस

जून महिन्यात सरासरी केवळ नऊ दिवस पावसाचे नोंदवण्यात आले आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 13 दिवस पाऊस झाला. गडहिंग्लज, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांत महिन्याभरात सरासरी पाचच दिवस पाऊस झाला आहे.

कडगाव परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जिल्ह्यात भुदरगड तालुक्यातील कडगाव परिसरात यावर्षी जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली आहे. या परिसरात जून महिन्यात 339.8 मि.मी. इतका पाऊस होतो. यावर्षी जून महिन्यात 410.1 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. सरासरी 120.69 टक्के पाऊस झाला. या परिसरात 15 दिवस पावसाचे होते.

सर्वाधिक पावसाच्या गगनबावडा तालुक्यात 55 टक्के पाऊस

जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा तालुका अशी ओळख असलेल्या गगनबावडा तालुक्यातही या महिन्यात सरासरीच्या 55.38 टक्केच पावसाची नोंद झाली. महिन्याभरात या तालुक्यात पावसाचे 14 दिवस होते.

कोल्हापूर शहरात महिन्याभरात केवळ 39 मि.मी.पाऊस

कोल्हापूर शहरात जून महिन्यात केवळ 39 मि.मी.इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात शहरात 113 मि.मी. इतका पाऊस झाला होता.

Back to top button