मुंबई : ठाकरे सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी सुरु

ईडी
ईडी
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ठाकरे सेनेचे सचिव सुरज चव्हाण यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. ईडीने सनदी अधिकारी संजीव जयस्वाल आणि सूरज चव्हाण यांना सोमवारी ईडीच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार, चव्हाण हे दुपारी साडेबाराच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले.

सूरज चव्हाण यांच्या ईडी चौकशीचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून निषेध करण्यात येणार होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी बेलार्ड पिअर परिसरात असलेल्या ईडी कार्यालयाबाहेर बॅरीगेट लाऊन कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. चव्हाण ईडी चौकशीला हजार होताना काही कार्यकर्ते ईडी कार्यालयाजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवले.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक निकटवर्तीय सुजीत पाटकर यांनी रातोरात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी स्थापन करुन कोविड सेंटर उभारणीची कंत्राटे मिळवली. याच कोविड सेंटरच्या माध्यमातून डॉक्टरांची नियुक्ती, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि अन्य साहित्य खरेदीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मनी लॉर्ड्रींग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे.

ईडीने गेल्या बुधवारी आणि गुरुवारी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या मनपा अधिकारी, कंत्राटदार, मध्यस्थ अशा संबंधितांच्या घर, कार्यालये आणि मालमत्तांसह पालिकेचे कार्यालय अशा १६ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत ईडीच्या हाती महत्वपूर्ण कागदपत्रे आणि दस्तऐवज लागले आहेत. याच्याच आधारे ईडीने पुढील तपास करत आता संबंधितांकडे चौकशी सुरु केली आहे.

ईडीने शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांच्या चेंबूरमधील निवासस्थानी बुधवारी घरी सकाळी नऊच्या सुमारास छापेमारी सुरु केली होती. ही छापेमारी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु होती. सुमारे साडेसोळा तास चाललेल्या या कारवाईत ईडीने चव्हाण यांचीही कसून चौकशी केली. सूरज चव्हाण यांनी मुंबई महानगर पालिकेकडून कोविड कंत्राटे देण्यात मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. चव्हाण यांनी याच काळात मुंबईत सुमारे १० कोटी रुपये किंमतीचे चार फ्लॅट विकत घेतले असून ईडीने या फ्लॅटस्च्या खरेदी बाबत चौकशी सुरु केली आहे.
ईडीने संजीव जयस्वाल यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर त्यांना समन्स बजावून गुरुवारी ईडीच्या बेलार्ड पियर येथील चौकशीला हजर रहाण्यास सांगितले होते. मात्र, जयस्वाल यांनी ईडीसमोर हजर रहाण्यासाठी चार दिवसांची मुदत मागितली होती. त्यानंतर ईडीने सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ते हजर झाले नसल्याची माहिती मिळते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news