Sanjay Raut: मोदी-शहांशी नव्हे, तर आमचं भांडण महाराष्ट्रद्रोह्यांशी: संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut: मोदी-शहांशी नव्हे, तर आमचं भांडण महाराष्ट्रद्रोह्यांशी: संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आमचं वैयक्तिक भांडण नाही. तर आमचं भांडण महाराष्ट्रद्रोह्यांशी आहे. महाराष्ट्राला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी आहे, असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर साधला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात ते (Sanjay Raut) बोलत होते.

राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले की, मुंबईतील सर्व उद्योग बाहेर नेण्याचे काम सुरू आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह मुंबईत येत आहेत. मुंबई का कब्जा लेंगे म्हणत आहेत. मग हिंमत असेल, तर निवडणूक घ्या, असे आव्हान राऊत यांनी यावेळी दिले. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, पण ते महत्त्व आता कमी करून गुजरातला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाची असताना सर्वात मोठे स्टेडियम गुजरातला बांधण्यात आले आहे.

शिंदे गटातील लोक म्हणतात, वाघ निघाले गोरेगावला. पण मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व वाघ तर माझ्यासमोर उपस्थित आहेत. मग गोरेगावला जातंय कोण? असा खोचक सवाल करत ‘वाघाची कातडी पांघरून लांडगे निघाले गोरेगावला’ हे वाक्य शिंदे गटासाठी योग्य आहे, असा टोला राऊत यांनी शिंदे गटाने केलेल्या पोस्टरबाजीवर लगावला.

शिंदे गटाला एक वर्ष पूर्ण होत नाही, तर ते शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. तुम्हाला शिवसेनेच्या जन्माची तारीख माहीत नाही, म्हणून निवडणूक आयोगाला खोके देऊन तारीख विकत घेतली का? असा सवाल राऊत यांनी शिंदे गटाला केला.

हेही वाचा 

Back to top button