एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची तुलना व्हायला नको: चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची तुलना व्हायला नको: चंद्रशेखर बावनकुळे

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात राज्यातील मुख्य वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून नाराजीचा सूर येऊ लागला आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना असा प्रकार पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेची जाहिरात म्हणजे एक खोडसाळपणा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी आहे. या जाहिरातीवरून थोडे मतभेद झाले पण पण मनभेद नाहीत. दोन सख्ख्या भावांमध्ये देखील मतभेद होतात. शिवसेना आणि भाजप हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत. त्यामुळे मतभेद होणे साहजिक आहे. हा विषय आता संपला आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे चांगले काम केले होते. भाजपचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. अष्टपैलू कामगिरी करत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवले आहे. पक्ष वाढीसाठी त्यांनी झोकून देऊन काम केले आहे. त्यामुळे या जाहिरातीमुळे भाजपचे पदाधिकारी, आमदार, खासदार नाराज झाले आहेत. शिंदे उत्कृष्ट काम करत आहेत. पण त्यांची फडणवीस यांच्याशी तुलना व्हायला नको.

अशा प्रकारच्या चुका सुधारून पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. याबाबत मी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. शिंदे आणि फडणवीस एकसंधपणे काम करत आहे. सरकारमध्ये मतभेद निर्माण होण्यासाठी कोण काम करत आहे का? हे बघितले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button