Maharashtra Politics : इजा ‘कानाला’ नव्‍हे ‘मनाला’…रोहित पवारांचे सुचक ट्विट | पुढारी

Maharashtra Politics : इजा 'कानाला' नव्‍हे 'मनाला'...रोहित पवारांचे सुचक ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे’, अशी हाक देत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.१३) एक जाहीरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये त्यांनी आकडेवारी देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले हाेते. याया जाहिरातीने भाजपमध्ये तीव्र पडसाद उमटले. तसेच यावर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्‍याची चर्चाही रंगली. या नाराजीनाट्यानंतर आज (दि. १४) पुन्हा एकदा शिवसेनेने जाहीरात दिली आहे. या जाहिरातीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहीत पवार एक सुचक ट्विट केले असून, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ( Maharashtra Politics )

ढोल वाजवण्याची वेळच आली नसती

शिवसेनेने आज (दि.१४) दिलेल्या जाहिरातीनंतर रोहित पवार यांनी सुचक ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय… यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय.. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का?”

Maharashtra Politicas : काय होती जाहिरात?

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण, यासंदर्भात एक सर्वेक्षण झाल्याचे नमूद करून त्याची जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. धनुष्यबाण चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीतून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के पसंतीचा दावा शिवसेनेच्या या जाहिरातीतून करण्यात आला हाेता. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचा संदेश देताना ‘राष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात करण्‍यात आली. राज्य भाजपमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले.

हेही वाचा 

Back to top button