Monsoon Updates | मान्सून गोव्याच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार | पुढारी

Monsoon Updates | मान्सून गोव्याच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार

पुढारी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून आज शनिवारी (१० जून) पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवार पर्यंत पुढे सरकला आहे. मान्सून पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात येण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिली आहे. (Monsoon Updates)

मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि ईशान्यकडील बहुतांश भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासांत मान्सून अरबी समुद्राचा मध्य भाग, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Monsoon Updates)

नियोजित वेळेपेक्षा सात दिवस उशिरा मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला. मान्सून सामान्यत: १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. पण यंदा त्याच्या आगमनाला उशीर झाला आहे.

दरम्यान, पूर्वमध्य अरबी समुद्रावरील (eastcentral Arabian Sea) अत्यंत तीव्र चक्रीवादळ (very severe cyclonic storm) ‘बिपरजॉय’ (Biporjoy Cyclone) गेल्या ६ तासांत प्रतितास ९ किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. आज १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३० वाजता ते अरबी समुद्रातील उत्तरेला घोंघावत होते. हे चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमी, मुंबईच्या पश्चिम-नैऋत्येस ६३० किमी, पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस ६२० किमी आणि कराचीच्या दक्षिणेस ९३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढील ३ दिवसांत ते हळूहळू उत्तर-वायव्य दिशेकडे सरकेल.

हे ही वाचा :

Back to top button