मुंबई, पुढारी वृत्तसेवा : देशभरातील उच्च शिक्षणाचे धडे देणार्या संस्थांचा दर्जा सुधारावा यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे सोमवारी नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) ही देशपातळीवरील क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये देशातील सर्वोत्तम 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाला यंदा स्थान मिळालेले नाही. तसेच महाविद्यालयांच्या यादीत पहिल्या 50 मध्ये राज्यातील एकाही महाविद्यालयाचा समावेश नाही आहे.
या यादीत मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट 17 व्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ हे 19व्या क्रमांकावर आहे. तर माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 23व्या क्रमांकावर आहे. पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल हे या यादीत 32व्या क्रमांकावर आहे. पुण्याचे डीवायपाटील विद्यापीठ 46व्या तर मुंबई विद्यापीठ 56 व्या क्रमांकावर आहे. अभियांत्रिकी संस्थांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईला 80.74 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले आहे. तर इनोव्हेशनच्या बाबतीत देशात मुंबई आयआयटीचा सातवा क्रमांक आहे. तर देशातील दंत महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याच्या डी.वाय.पाटील विद्यापीठ तिसर्या क्रमांकावर आहे.
सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत प्रथम, तर मुंबई आयआयटी संस्थेची मागील वर्षीच्या तुलनेत एका क्रमांकाने घसरण झाली आहे. मागील काही वर्षात स्वायत्त संस्था झालेल्या सावित्रीबाई पुणे विद्यापीठाची यावेळी रँकिंगमध्ये घसरण झाली असून मुंबई विद्यापीठाची मागील वर्षी 45 व्यास्थानावरून यावेळी 56 व्या घसरण झाली आहे.
एकूण 10 विद्यापीठे या क्रमवारीत झळकली आहेत. गेल्या वर्षी या क्रमवारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 83 व्या क्रमांकावर होते. पण यंदा या विद्यापीठाने पहिल्या शंभरातील स्थान गमावले आहे. मुंबई विद्यापीठाची घसरण झाली आहे. मागील वर्षी 45 व्या स्थानावर असलेले विद्यापीठांचे रँकींग घसरले आहे. परीक्षा, पुर्नमुल्यांकन आणि निकालांमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यापीठाची रँकिंग घसरली असल्याची चर्चा आहे.
आयआयटी मुंबई ही संस्था तिसर्या क्रमांकावर होती. मात्र यंदा संस्थेच्या रँकिंगमध्ये एका क्रमांकाने घसरण झाली आहे. आयआयटी मुंबईने एकूण श्रेणीत चौथा, अभियांत्रिकीमध्ये तिसरा, व्यवस्थापनात दहावा, संशोधनात चौथा आणि नव्याने समाविष्ट केलेल्या 'इनोव्हेशन' श्रेणीत सातवा क्रमांक पटकावला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा घसरला!
'एनआयआरएफ'च्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओव्हरऑल रँकिंगमध्ये 35 व्या, तर विद्यापीठांच्या गटात 19 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा घसरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागील वर्षी विद्यापीठ ओव्हरऑल गटात 25 व्या स्थानावर होते. 2020 मध्ये विद्यापीठ गटात नवव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाची ही घसरण चिंता वाढवणारी आहे. विद्यापीठाला एकूण सरासरी 58.31 गुण मिळाले आहेत. तर, ओव्हरऑल गटात 55.78 गुण आहेत.