Stock Market Closing | शेअर बाजारात खरेदीचे वारे! सेन्सेक्स २४० अंकांनी वाढून बंद, ‘निफ्टी ऑटो’चा उच्चांक | पुढारी

Stock Market Closing | शेअर बाजारात खरेदीचे वारे! सेन्सेक्स २४० अंकांनी वाढून बंद, 'निफ्टी ऑटो'चा उच्चांक

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील संमिश्र स्वरुपाच्या नोकऱ्यांच्या अहवालानंतर फेडरल रिझर्व्ह या महिन्यात व्याजदर वाढीला विराम देईल या आशेने आणि जागतिक मजबूत संकेतांच्या जोरावर आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. सेन्सेक्स (Sensex) आज २४० अंकांनी वाढून ६२,७८७ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ५९ अंकांच्या वाढीसह १८,५९३ वर स्थिरावला. बाजारात आज खरेदी दिसून आली. आजच्या तेजीत ऑटो आणि मीडिया सेक्टर आघाडीवर राहिले. निफ्टीत एम अँड एमचा (M&M) शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढला. ॲक्सिस बँक आणि टाटा मोटर्सचेही शेअर्सही वधारले. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर १ टक्के वाढून प्रत्येकी २,४८० रुपयांवर पोहोचला.

‘हे’ शेअर्स टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर एम अँड एम, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, एलटी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, मारुती हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक, टीसीएस हे शेअर्स घसरले.

निफ्टी ऑटोने उच्चांक गाठला

विक्रीचा वाढलेला आकडा आणि सुधारित सेमीकंडक्टर चिप्सच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर निफ्टी ऑटोने सोमवारी पहिल्यांदा १४,५०० चा टप्पा ओलांडला. निफ्टी ऑटोने १४,५३० वर व्यवहार केला. गेल्या महिन्यात, निफ्टी ५० मधील ३ टक्के वाढीच्या तुलनेत निफ्टी ऑटो इंडेक्स ९ टक्के वाढला आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये M&M आणि अशोक लेलँडचे शेअर्स सुमारे २ टक्के वाढले होते.

NSE निफ्टी निर्देशांकावर M&M, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, ग्रासीम, Sun Pharma हे वाढले. Divi’s Lab, Asian Paints, BPCL, TechM, हिंदुस्तान युनिलिव्हर हे घसरले होते.

Lupin चे शेअर्स वाढले

फार्मा क्षेत्रातील प्रमुख कंपनी लुपीनचे (Lupin shares) शेअर्स आज BSE वर २ टक्के वाढले. हे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर ८३० रुपयांवर पोहोचले. लुपीनने Darunavir च्या ६०० mg आणि ८०० mg टॅब्लेट्स लाँच केल्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे शेअर्स वधारले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

अमेरिकी काँग्रेसने कर्ज मर्यादा डील मंजूर केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती २ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड २.४९ टक्क्यांनी वाढले आणि प्रति बॅरल ७६.१३ डॉलरवर पोहोचले. तर अमेरिकन क्रूड अर्थात US West Texas Intermediate (WTI) २.३४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७१.७४ डॉलर झाले आहे.

आशियाई बाजारातही खरेदीचा हंगाम

शुक्रवारी अमेरिकेतील बाजार मजबूत होऊन बंद झाले होते. दरम्यान, आज आशियाई बाजारात खरेदी दिसून आली. जपानचा निक्केई तेजीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा ‘शांघाय कंपोझिट हे निर्देशांकही आज वधारले होते.

हे ही वाचा :

Back to top button