अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 34.75 अंक व 45.42 अंकांची वाढ होऊन 18534.1 अंक व 62547.11 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीने 0.19 टक्के, तर सेन्सेक्सने 0.07 टक्क्यांची वाढ नोंदवली. झी एंटरटेन्मेंट (8.19 टक्के), हिरो मोटोकोर्प (5.85 टक्के) येस बँक (5.81 टक्के), सन फार्मा (5.78 टक्के) या कंपन्यांच्या समभागांनी गत सप्ताहात सर्वाधिक वाढ दर्शवली. तसेच ओएनजीसी (-6.81 टक्के), वेदांता (-5.31 टक्के), कोल इंडिया (-3.81 टक्के) या कंपन्यांच्या समभागांनी सर्वाधिक घट दर्शवली. निफ्टी व सेन्सेक्स आपल्या सर्वोच्च विक्रमी पातळीपासून आता केवळ 2 ते 3 टक्के दूर आहेत. या दरम्यान बीएसई मिडकॅप इंडेक्सने आतापर्यंतची सर्वोच्च विक्रमी पातळी 27322.22 अंक व स्मॉलकॅप इंडेक्सने वर्षभरातील सर्वोच्च पातळी 30969.95 अंकांना स्पर्श केला.
या सप्ताहात भारतीय उद्योग क्षेत्राच्या द़ृष्टीने काही सकारात्मक संकेत मिळाले. मे महिन्यात भारताच्या निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक (पीएमआय मॅन्युफॅक्चरिंग) मागील 31 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 58.7 वर पोहोचला. जानेवारी 2021 नंतरची ही सर्वाधिक वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील अमेरिकेच्या संसदेने अमेरिकेची कर्ज घेण्याची असलेली मर्यादा (डेट सिलिंग) वाढवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ही मर्यादा 31.4 लाख कोटी डॉलर्स होती. परंतु ही मर्यादा वाढवली नसती तर अमेरिकेच्या सरकारची अनेक देणी थकली असती.
टाटा उद्योग समूह इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांची बॅटरी तयार करणार. लिथिअम आयन बॅटरी सेल तयार करण्याचा कारखाना टाटा समूह गुजरातमध्ये उभारणार. यासाठी एकूण 13 हजार कोटी (1.58 अब्ज डॉलर्स)ची गुंतवणूक केली जाणार. यामुळे सुमारे 13 हजार जणांना थेट किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार. या प्रकल्पामुळे चीन आणि दक्षिण कोरियावरील बॅटरी सेलवरील असलेले अवलंबित्व कमी होणार.

मे महिन्यात देशातील वस्तू आणि सेवा करसंकलनात (जीएसटी कलेक्शन) भरघोस वाढ. मे 2022 मधील 1 लाख 41 हजार कोटींच्या तुलनेत यावर्षी 1 लाख 57 हजार कोटींपर्यंत जीएसटी संकलन. जीएसटी संकलनात एकूण 12 टक्क्यांची वाढ. एप्रिल 2023 मध्ये सर्वाधिक म्हणजे 1 लाख 87 हजार कोटींचे जीएसटी करसंकलन झाले होते. मे 2023 मध्ये एकट्या महाराष्ट्राकडून 23536 कोटींचे जीएसटी संकलन झाले. जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी असून, दुसर्‍या क्रमांकावर कर्नाटक (10317 कोटी), तर तिसर्‍या क्रमांकावर गुजरात (9800 कोटी) आहे.

ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुविधा पुरवणारी स्टार्टअप कंपनी बायजूज आणि कर्जदात्या संस्थांमधील वाटाघाटी असफल. 1.2 अब्ज डॉलर्स किमतीचे कर्ज पुनर्गठित (रिस्ट्रक्चर) करण्यासंबंधीही बोलणी सुरू होती. बायजूज कंपनीला कर्ज परतफेड करण्यासाठी अधिक कालावधीची गरज होती. या बदल्यात व्याजदर वाढवून देण्याचीदेखील तयारी होती. परंतु कर्जदात्या कंपनीने बायजूजवर 50 कोटी डॉलर रक्कम लपवल्याचा आरोप केला व अमेरिकेच्या कोर्टात खेचले. त्यामुळे ब्लॅकरॉक या बायजूजमधील गुंतवणूकदाराने बायजूजचे मूल्य (तरर्श्रीींळेप) 11.15 अब्ज डॉलर्सवरून 8.4 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आणले. मागील वर्षी हे मूल्य सर्वाधिक 22 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले होते.

एलआयसीचा आयडीबीआय बँकेतील हिस्सा खरेदी करणार्‍या गुंतवणूकदारास करामधून सूट मिळणार. बर्‍याच वेळा हिस्सा हस्तांतरणाच्या बातमीने त्या कंपनीच्या समभागाचे मूल्य (शेअर प्राईस) वाढते. अशा वेळी वाढीव किमतीवर खरेदीदारास 30 टक्के कर भरावा लागतो. परंतु एलआयसीचा आयडीबीआयमधील हिस्सा खरेदी करणार्‍यास यातून सूट मिळणार आहे.

मे महिन्यात यूपीआय व्यवहारांचा नवीन उच्चांक. मे महिन्यात एकूण 14.9 लाख कोटी किमतीचे 9.41 अब्ज व्यवहार करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या तुलनेत किमतीमध्ये 2 टक्क्यांची वाढ, तर एकूण व्यवहारामध्ये तब्बल 6 टक्क्यांची वाढ दिसून आली.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलचा तोटा 8161 कोटींवर गेला. मागील वर्षी हा तोटा 6982 कोटी होता.
जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी कंपनी इंटरब्रँडच्या यादीनुसार टीसीएस कंपनी भारतातील सर्वात मूल्यवान म्हणजे 1.09 लाख कोटींची ब्रँड व्हॅल्यू असलेली कंपनी ठरली. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजची ब्रँड व्हॅल्यू असलेली कंपनी ठरली. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजची ब्रँड व्हॅल्यू 65320 कोटी इतकी आहे.

फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स या फ्युचर उद्योग समूहाच्या कंपनीच्या दिवाळखोरी प्रक्रियेत (इन्सॉल्वन्सी प्रोसिडिंग्स) एकूण 12 कर्जदात्या संस्थांचे 2155.53 कोटींच्या थकीत कर्जांचे दावे आले. यामध्ये एसबीआय (476.59 कोटी), सेंट्रल बँक (444.76 कोटी), बँक ऑफ इंडिया (417.33 कोटी), बँक ऑफ बडोदा (296.79 कोटी) यांसारख्या सरकारी बँकांचे कर्जाचे दावे आहेत.

एसबीआय लाईफ इन्श्युरन्स सहारा लाईफ इन्श्युरन्सचा संपूर्ण व्यवसाय ताब्यात घेणार. सहारा इंडिया लाईफ इन्श्युरन्सचे सध्या 2 लाख पॉलिसीधारक. सहारा इंडियाला 2000 साली जीवन विमा विकण्याचा परवाना मिळाला. परंतु आर्थिक अडचणीमुळे 2017 साली सरकारने या कंपनीवर प्रशासक नेमले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये सहारा इंडिया लाईफ इन्श्युरन्सला 1862 कोटींचा तोटा झाला होता.
26 मे रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 4.3 अब्ज डॉलर्सनी घटून 589.1 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

– प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

Back to top button