Shivrajyabhishek Sohala | छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्य आणि शौर्याचे प्रतिक! पंतप्रधान मोदींच्या शिवराज्याभिषेक दिनी मराठीतून शुभेच्छा | पुढारी

Shivrajyabhishek Sohala | छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्य आणि शौर्याचे प्रतिक! पंतप्रधान मोदींच्या शिवराज्याभिषेक दिनी मराठीतून शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Sohala) सोहळ्याच्या निमित्ताने मराठीतून शुभेच्छा दिल्या आणि शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्य आणि शौर्याचे प्रतिक आहेत. त्यांचे आदर्श हे महान प्रेरणास्रोत आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. ”छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे झाल्यानिमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,” असेही त्यांनी मराठीतून दिलेल्या संदेशात म्हटले. (Shivrajyabhishek Sohala )

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन नवी चेतना, नवी ऊर्जा घेऊन आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा त्या कालखंडातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. राष्ट्र कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या कारभाराचे मूलभूत तत्व होते. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर लढवय्ये होते. ते एक उत्तम प्रशासक होते. त्यांनी गुलामगिरीच्या मानसिकतेला संपवलं. या गुलामगिरीने देशातील लोकांचा आत्मविश्वास हिरावून घेतला होता. असेही मोदींनी नमूद केले.

मोदी म्हणाले, आजादी का अमृत महोत्सवात ३५० वे राज्याभिषेक दिन पाहता आला, हे भाग्यचं आहे. छत्रपती शिवरायांच्या सुशासन-समृद्धीच्या गाथा आम्हाला प्रेरित करतात. महाराष्ट्र सरकारलाही सोहळ्याच्या शुभेच्छा. संपूर्ण वर्षभर या प्रकारचे आयोजक सोहळा आयोजित करत असतात. आज स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रांगणात शानदार आयोजन केलं गेलं. संपूर्ण राज्यात सोहळा साजरा केला जात आहे. स्वराज्याची ललकार आणि राष्ट्रीयतेची जयजयकार ऐकू आली. शिवरायांनी नेहमीच एकता आणि अखंडतेला सर्वपरी दिलं आहे. आज एक भारत श्रेष्ठ भारतच्या रुपात उभा आहे. त्यांनी जनतेला राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरित केलं. प्रशासनिक क्षमता, उत्तम शासन व्यवस्थेतून शिवरायांनी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना केली. शिवरायांनी खूप कमी वयात शत्रूंना हरवून आपल्या सैन्याचे नेतृत्व केले. इतिहासाच्या दुसऱ्या नायकापेक्षा ते वेगळे ठरले. महिला सशक्तीकरण, सामान्य माणसे , शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य, शासनप्रणाली आणि निती आजही प्रासंगिक प्रभावी आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांनी किल्ले रायगडावर भाषणात गौरवोद्गार काढत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यंदाचं ३५० वे वर्ष आहे. एक नवीन सूर्य उगवला आणि छत्रपतींनी रयतेच्या राज्याची स्थापना केली. जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत शिवरायांचं नाव अजरामर राहिल. महाकवी भूषण यांनी वर्णन केलं आहे – दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है। तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज है॥

फडणवीस यांनी शिवरायांचे स्मारक दिल्लीत झालं पाहिजे, अशी मागणीची विनंती यावेळी केली. रायगडाच्या संवर्धन किंवा पुननिर्मितीकरिता समिती स्थापन करण्यात आलीय. यामध्ये छत्रपती संभाजीराजेंना स्थान दिलं. पण काही नियमांमुळे धिम्या गतीने काम झालं. छत्रपतींच्या नावाने आम्ही राज्य करतोय. गोगावलेंची शिवसृष्टीची मागणी योग्य आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केलं.

Back to top button