NLC Bharat : मुंबईत देशातील सर्व पक्षांचे आमदार जूनमध्ये येणार एकत्र

NLC Bharat : मुंबईत देशातील सर्व पक्षांचे आमदार जूनमध्ये येणार एकत्र
Published on
Updated on

धुळे; पुढारी वृत्तसेवा : भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील सर्वपक्षीय आमदार राष्ट्रीय विधायक संमेेलनामध्ये (NLC Bharat) एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणार आहेत. नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण व्हावा हा या मागील उद्देश आहे.

पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित 'राष्ट्रीय विधायक संमेेलन, भारत' (NLC Bharat) हे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटर मध्ये दि. १५ जून ते १७ जून या दरम्यान होत आहे. भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहेत. अशी माहिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, त्यांनी आवाहन केले की राज्यातील सर्व पक्षातील आमदारांनी या संमेलनात सहभागी होऊन आपल्या लोकशाहीला अधिक सशक्त करण्यास योगदान द्यावे.

या वेळी धुळ्याच्या महापौर प्रतिभा चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर जयश्री अहिरराव, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील व सह समन्वयक प्रकाश महाले, धुळे जिल्ह्याचे समन्वयक जगदीश देवरे,जिल्हा परिषदेचे सदस्य राम भदाने, जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम पाटील आणि किसान मोर्चाचे रामकृष्ण खलाणे उपस्थित होते. प्रत्येक सत्रांमध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्ष पद विधानसभेचे सभापती, विधानपरिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते हे भूषविणार आहेत.

राष्ट्रीय विधायक संमेलनात (National Legislators' Conference Bharat) आतापर्यंत भारतातील सर्व राज्यातील एकूण १८०० आमदारांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. तसेच, एकूण २५०० आमदार येण्याची अपेक्षा आहे. तसेच देशातील वेगवेगळ्या राज्यातील आमदारांना एकमेकांमध्ये संवाद घडविणे, सुशासनाच्या मुद्यांवर शिकणे आणि लोकशाहीला शक्तीशाली बनविण्यासाठी निर्माण केले गेले आहे.

लोकशाही राज्यपध्दतीनुसार लोकांनी विश्वासाने निवडून दिलेला आमदार हा लोकप्रतिनिधी शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. स्थानिक पातळीवर आमदारांनी प्रत्यक्ष कृतितून साकारलेला सर्वांगीण शाश्वत विकास म्हणजेच खर्‍या अर्थाने राष्ट्रनिर्माण असे निश्चितपणे म्हणता येईल. राष्ट्रीय विधायक संमेलनातून देशातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात शाश्वत स्वरूपाचा सर्वांगीण विकास साधण्याची नवचेतना, नवप्रेरणा, अभिनव व्यापक दृष्टि आणि निश्चित दिशा मिळणार आहे. देशातील आमदारांना या संमेलनातून मिळणारी रचनात्मक कार्याची प्रेरणा, चेतना, दृष्टि आणि निश्चित दिशा हे राष्ट्रीय विधायक संमेलनाचे फार मौलिक स्वरूपाचे फलित असू शकेल.

राष्ट्रीय एकात्मिकतेचा, राष्ट्रीय लोकशाहीच्या सर्वांगीण सशक्तीकरणाचा आणि राष्ट्राच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचा कृतिशील विचार देशातील विविध राज्यांनी स्वतंत्र व एककल्ली न करता त्यांचे राज्य म्हणून असणारे स्वातंत्र्य व वैविध्य जपत एकत्रित, एकात्मिकपणे करणे अधिक व्यवहार्य ठरणारे आहे. प्रामुख्याने हे विचारसुत्र समोर ठेवून देशातील सर्व आमदारांना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणणारे हे संमेलन म्हणूनच फार पायाभूत कार्य साधणारे ठरणार आहे.

देशामध्ये प्रथमच घडून येणारे हे संमेलन देशाला सतत पुरोगामी विचार आणि नेतृत्व देणार्‍या महाराष्ट्राच्या भूमित म्हणजेच मुंबईत होत आहे. महाराष्ट्र शासन या संमेलनाच्या आयोजनात यजमानाच्या भूमिकेतून सहभागी झाले आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा अखंडपणे अभ्यास आणि संशोधन साक्षेपाने करणार्‍या जाणत्या, विचारवंत, पत्रकार, साहित्यिक, कृतिशील सामाजिक कार्यकर्त्यांकडून 'राष्ट्रीय विधायक संमेलना'चे स्वागत व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news