SCSS : मुदत ठेवीपेक्षा अधिक परतावा हवाय? | पुढारी

SCSS : मुदत ठेवीपेक्षा अधिक परतावा हवाय?

सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (एससीएसएस) ही सरकार पुरस्कृत योजना ज्येष्ठ नागरिकांत खूपच लोकप्रिय आहे. सध्याच्या काळात या योजनेतील व्याजदर वाढल्याने या योजनेचे आकर्षण बरेच वाढले आहे.

नोकरदार वर्गांना निवृत्तीच्या काळात पीएफ, ग्रॅच्युटी आणि लिव्ह इन्कॅशमेंटच्या रूपाने मोठी रक्कम मिळते. जी मंडळी निवृत्तीच्या अगोदरच गृहकर्ज घेऊन घर बांधतात, एज्युकेशन लोन घेऊन पाल्यांचे शिक्षण पूर्ण करतात, मुलांचा विवाह करून पर्सनल लोनदेखील चुकवतात तेव्हा त्यांना निवृत्तीच्या वेळी मिळालेली मोठी रक्कम केवळ त्यांच्या बचत खात्याची शोभा वाढवते. साधारणपणे बहुतांश ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवीत पैसे ठेवतात. परंतु सध्याच्या काळात ठेवीच्या तुलनेत ज्येेष्ठ नागरिकांसाठीची पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीझन सेव्हिंग स्किम (एससीएसएस) ही अधिक फायदेशीर आहे.

‘एससीएसएस’ म्हणजे काय?

सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमवर सध्याच्या काळात चांगले व्याजदर दिले जात आहेत. या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर प्राप्तिकर सवलतीसाठी देखील दावा करता येतो. या योजनेत 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात. याशिवाय ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे, असे 55 ते 60 वयोगटातील कर्मचारी देखील या योजनेचा फायदा उचलू शकतात. या योजनेत एचयूएफ आणि अनिवासी भारतीयांना गुंतवणुकीसाठी परवानगी नाही.

योजनेतील गुंतवणुकीचे लाभ

एससीएसएस योजना ही सध्याच्या काळात मुदत ठेवीपेक्षा अधिक व्याजदर या योजनेवर दिले जात आहे. सरकार पुरस्कृत असल्याने ज्येष्ठांना ही योजना विश्वासपात्र मानली जाते. ही योजना पोस्ट आणि बँकेत उपलब्ध आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात टपाल कार्यालय असल्याने ग्रामीण भागातील ज्येष्ठांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचे व्याज तिमाहीच्या आधारावर दिले जाते.

योजनेच्या परिपक्वतेचा कालावधी

या योजनेचा परिपक्तेचा कालावधी म्हणजे मॅच्योरिटी पीरियड हा पाच वर्षांचा आहे. यास कमीत कमी एकदा तीन वर्षांसाठी वाढवता येते. या योजनेत मुदतपूर्व पैसे काढले, तर दंड आकारला जातो. एखादा व्यक्ती मुदतपूर्वीच पैसे काढत असेल, तर त्याला रकमेच्या दीड टक्के दंड भरावा लागतो. दोन वर्षांनंतर पैसे काढले तर दंडाची आकारणी एक टक्क्याने होते.

व्याजदरात सवलत

या योजनेत कलम 80 सी नुसार दीड लाखांपर्यंत वार्षिक गुंतवणुकीवर सवलत दिली जाते. अर्थात, मॅच्योरिटीनंतर मिळणारी रक्कम ही उत्पन्न म्हणून गृहीत धरली जाते. त्यावर प्राप्तिकर भरावा लागतो.

कमाल गुंतवणूक मर्यादा

या योजनेत कमाल गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपये आहे. यात सरकारकडून कधी कधी वाढही केली जाते. योजनेत किमान गुंतवणूक एक हजार आहे. कोणताही व्यक्ती एक हजार रुपये भरून योजना कार्यान्वित करू शकतो. त्यानंतर यात गुंतवणूक वाढवता येते.

किती फायदा?

बँकेचे व्याजदर सध्या उच्चांकी पातळीवर राहत आहेत. तरीही मुदत ठेवीपेक्षा एससीएसएस हे अधिक फायदेशीर ठरते. एससीएसएसमध्ये सध्या 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे. सिनियर सिटीझनच्या बँकेतील ठेवीवर किमान 6.25 टक्के आणि कमाल व्याजदर 7.75 टक्के दिले जात आहे. याचा विचार केल्यास, सिनियर सिटीझन सेव्हिंगवर अधिक व्याज दिले जात आहे. एखादा ज्येष्ठ नागरिक पाच वर्षांसाठी वीस लाख रुपये गुंतवणूक करत असेल, तर त्याला मॅच्योरिटीच्या काळात 30.01 लाख रुपये मिळतील. याप्रमाणे एखादा व्यक्ती मुदत ठेवीत 20 लाख रुपये ठेवत असेल, तर 7.75 टक्के दराने व्याज दिले जात असेल तर त्यास 29.25 लाख रुपये मिळतील.

स्वाती देसाई

Back to top button