Rahul Narvekar : मला धमक्या दिल्‍या तरी त्यांना हवा तसा निर्णय मिळणार नाही : विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर | पुढारी

Rahul Narvekar : मला धमक्या दिल्‍या तरी त्यांना हवा तसा निर्णय मिळणार नाही : विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर

पुढारी ऑनलाईन : मी राजकीय दबावाखाली येऊन निर्णय घेईन, असा वारंवार आरोप केला जात आहे. यावरून मला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत; पण अशा धमक्या देऊन त्यांना हवा तसा निर्णय मिळणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि.१६) माध्यमांशी बोलताना केले. विधिमंडळातील अधिकाऱ्यांबराेबर आयाेजित बैठक संपल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बाेलत हाेते.

यावेळी  नार्वेकर म्‍हणाले, सर्वोच्‍च  न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो.  न्यायालयाने दिलेल्या निर्णयात संविधानिक शिस्त कायम ठेवली आहे. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. मी राजकीय दबावाखाली येऊन निर्णय घेईन, असा वारंवार आरोप होतो; पण मी हा आरोप थांबवू शकत नाही. मी आत्तापर्यंत कोणतेही काम दबावाखाली केलेलं नाही. इथून पुढे देखील कोणाच्याही दबावाखाली काम करणार नाही. लवकरात लवकर निर्णय घेऊ, पण यामध्ये कोणतीही घाई केली जाणार नाही, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

माझ्याकडे ५४ आमदारांविरूद्ध याचिका दाखल झाल्या आहेत. यातील प्रत्येक याचिकेची दखल घेत आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय घेतला जाईल. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा घटनेला अनुसरून आणि नियमानुसारच घेतला जाईल. कोर्टाला सत्तासंघर्षावरील निर्णय देण्यास १० महिने लागले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना देखील वेळ लागू शकतो. घटनात्मक बाबी तपासून याविषयी निर्णय घ्यायला किती काळ लागेल, हे मी सांगू शकत नाही, असेही नार्वेकर यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

Back to top button