15 ते 20 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात ! | पुढारी

15 ते 20 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

भाजप मधील अनेक नगरसेवक यांना आता स्वतःच्या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. भाजपचा उमेदवार म्हणून निवडून येण्याची अनेकांना खात्री नाही, अशा नगरसेवकांनी शिवसेनेशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 15 ते 20 नगरसेवकांनी संपर्क साधला असून डिसेंबरमध्ये या नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्षात फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आतापासूनच राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी एकमेकांचे नगरसेवक फोडल्यावर शिवसेना भाजप पक्षाचे लक्ष राहणार आहे. अलीकडेच भाजपने शिवसेना कॉंग्रेसचे नगरसेवक संपर्कात असल्याचे म्हटले होते. मात्र या जर-तरच्या गोष्टी होत्या. शिवसेनेने मात्र थेट पत्रकार परिषद घेऊनच भाजपाचे 15 ते 20 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या अगोदर शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते. आता 15 ते 20 नगरसेवक फोडले जाणार असल्यामुळे भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मुंबईकरांनी भरभरून मते दिली होती. मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असल्यामुळे मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकही हे तीन पक्ष एकत्रित लढवतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप 2017 इतके नगरसेवक निवडून आणू शकत नाही, असे बोलले जात आहे. दरम्यान सोमवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे जाहीर केले. एवढेच नाही तर, डिसेंबर मध्ये आम्ही धमाका करू असा दावाही जाधव यांनी यावेळी केला.

शिवसेनेचा फुसका बार – भाजप

भाजपचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे. असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे. गेले 25 वर्षे युतीत असताना भाजपने लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा शिवसेनेला उमेदवार दिले आहेत. स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत असल्याचा टोला भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी लगावला.

हेही वाचलत का?

Back to top button