

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर निर्णय घेतील. दरम्यान, १६ आमदार जरी अपात्र ठरले, तरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही, सरकारला कोणताही धोका नाही, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.१५) येथे स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले की, कर्नाटकातील निकालामुळे राज्यातील महाविकास आघाडीची वज्रमूठ आणखी घट्ट झाली आहे. महाविकास आघाडीतील सर्वांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे आता पुढची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
एक्झिट पोलचा अंदाज चुकवत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षे पेक्षा जादा जागा मिळाल्या आहेत. तर या निकालामुळे भाजपमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. या निकालावरून महाविकास आघाडीची पुढची दिशा ठरविण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. यावेळी लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन जागा वाटप करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य असतील.
अकोला दंगलीची माहिती घेतली आहे. या दंगलीमागील मास्टरमाईंड कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. अशा दंगलीच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर पोलीस यंत्रणेच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप थांबविला पाहिजे, महाराष्ट्रातील दंगलींना सरकारने आळा घातला पाहिजे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या समन्सबाबत विचारले असता पवार म्हणाले की, याबाबत जयंत पाटील यांच्याशी चर्चा झालेली नाही. आज त्यांच्याशी माझी बैठक होणार आहे. यावेळी त्याबाबत माहिती घेतली जाईल,असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा