मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच, अजित पवार यांचा पुनरुच्चार | पुढारी

मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच, अजित पवार यांचा पुनरुच्चार

बारामती; पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसात कारण नसताना वृत्तपत्र, टीव्हीवर माझ्याबाबतच्या अनेक बातम्या, अफवा, वावड्या सुरु आहेत. कारण नसताना माझ्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. परंतु कार्यकर्त्यांनी या अफवांना बळी पडू नये. मी एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ति आहे. मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. बारामतीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पवार म्हणाले, गेली काही दिवस सारखी माझीच चर्चा चालू आहे. त्यांना अजित पवार एवढा का आवडला समजत नाही. मी नाॅट रिचेबल असलो की दिल्ली, मुंबईपासूनचे पत्रकार मागे लागतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी माझे कार्यक्रम असतात. त्यामुळे कधी काही कार्यक्रमांना हजर राहता येत नाही. तिथे नाही गेलो तर अजित पवार का आले नाहीत, कार्यक्रमाला गेलो तर इथेच का आले, अशा अनेक शंका नाहक निर्माण करत आहेत.

आता मी माझ्या शरीराचा अर्धा भाग इकडे आणि अर्धा तिकडे पाठवू का ? असा सवाल त्यांनी केला. मी काही बोललो की त्याचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मी बोललो तर असेच का बोललो, बोललो नाही तर का ? असे नाहक प्रश्न निर्माण केले जात आहेत. काहींना वाटतेय मी सकाळी आठला पुन्हा जातोय की काय? पण मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे. पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल. मी त्याच्याशी सहमत असेल. लोकांचे भले करण्याचे काम मी करतोय. सकाळी लवकर कामाला सुरुवात करून रात्री उशीरापर्यंत काम करतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या बातम्यांकडे लक्ष देवू नये. कामाकडे लक्ष देत तेथे योगदान द्या, असे आवाहन पवार यांनी केले.

आता काय गचुरे धरू की मारामारी करू

राज्यात काम करताना मी सत्ताधाऱ्यांना तीव्र विरोध करत नाही, साॅफ्ट भूमिका घेतो, असा आरोप केला जात आहे. हा आरोप मला मान्य नाही. मी सभ्यता पाळतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ती शिकवण आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र घडविणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची शिकवण पवार यांनी अंगिकारली. आम्ही ती पुढे नेत आहोत.

विरोध आहे म्हणून आता काय मी त्याचे गचुरे धरू की मारामारी करू, म्हणजे मी विरोध केल्यासारखे दिसेल, असे सांगून पवार म्हणाले, विरोधक म्हणून काही सभ्यता आम्ही पाळली पाहिजे. चुकीचे बोलून काय साध्य होणार आहे. पवार यांच्यावरही राजकीय जीवनात अनेकदा कमरेखालचे आरोप झाले. पण त्यांनी विकासावरच बोलणे सुरु केले. खैरनार यांच्यापासून अनेकांनी त्यांच्यावर आरोप केले. दाउदशी संबंध जोडले. पप्पू कलानीचे नाव घेतले, एनराॅनच्या बाबतीच नको तितकी बदनामी केली. शक्तीस्थळावरच हल्ला झाला.

शेवटी लोक गोड फळे असणाऱया झाडालाच दगड मारतात. कडू फळे असणाऱया झाडाकडे पोपटसुद्धा जात नाही. मी माझ्या हाती असलेल्या संसदीय आयुधांचा वापर करत विरोधकांना कोंडीत पकडतो. त्यामुळे मी विरोधकांबाबत साॅफ्ट भूमिका घेतो, हा आरोप मला मान्य नाही. विधीमंडळात मी विरोधी पक्षनेता म्हणून अनेक विषयांवर आवाज उठवतो. इतर राज्यात विधानसभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, खुर्च्या फेकणे, वाईट बोलणे ते अगदी मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत, या पद्धतीने विरोध मला अजिबात मान्य नसल्याचे पवार म्हणाले.

Back to top button