रस्ते की यमदूत मार्ग ! पुण्यातील 24 मार्ग ठरले अपघाताचे ब्लॅकस्पॉट | पुढारी

रस्ते की यमदूत मार्ग ! पुण्यातील 24 मार्ग ठरले अपघाताचे ब्लॅकस्पॉट

महेंद्र कांबळे : 

पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे रस्त्यांचाही जीव गुदमरू लागला आहे. माणसांना मोकळा श्वास घेणे तर लांबच, पण, वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनांचीदेखील जणू रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते, अन् यातूनच सुरू होते अपघाताची मालिका मागील साडेपाच वर्षांत झालेल्या 4 हजार 70 अपघातांमध्ये तब्बल 1 हजार 324 नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामध्ये 2 हजार 424 जणांना गंभीर दुखापत झाल्याचे व त्यातील काहींना कायमचे अपंगत्व आल्याचे समोर आले आहे. जणू पुण्यातील 24 ठिकाणावरील मार्ग (24 ब्लॅकस्पॉट) यमदूत मार्ग म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. शहराची ओळख आता वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांचे शहर म्हणून होत आहे. वेगाची नशा, विनाहेल्मेट प्रवास, सिग्नल न पाळणे, नियमांचे पालन न करता बेदरकारपणे वाहन चालवणे अपघाताचे कारण ठरून अनेकांच्या जिवावर बेतत असल्याने दुचाकींच्या शहरात रस्तोरस्ती मृत्यूचे सापळेच झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रोज जातोय एकाचा बळी…
शहरातील ब्लॅक स्पॉटची संख्या 19 वरून 24 वर गेली आहे. दिवसाला अपघाताच्या दोन घटना आणि अपघातात रोज एकाला आपला जीव गमवावा लागत आहे. बेजबाबदार डंपर, पीएमपीएल बसचालक, पाण्याचे टँकर, कचरा वाहनाचे कंटेनर जणू आता काळच बनले आहेत. त्यामुळे वाहन चालवताय, जरा सावधान ! असेच म्हणण्याची सध्या वेळ आहे. वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करूनही सर्रास हेल्मेट न वापरताच प्रवास केला जात आहे. वाहतूक नियमभंग करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.

विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपघात होणारे संवेदनशील रस्ते
वारजे : माई मंगेशकर हॉस्पिटल, मुठा नदी पूल, डुक्कर खिंड
मुंढवा : कात्रज चौक, दरी पूल, नवीन कात्रज बोगदा
हडपसर : आयबीएम कंपनी, रविदर्शन 15 नंबर,
विमानतळ : टाटा गार्डरूम चौक, 509 चौक, विमाननगर चौक, खराडी जकातनाका
चंदननगर : खराडी बायपास, रिलायन्स मार्ट,
कोंढवा : खडी मशिन चौक
सिंहगड रोड : नवले पूल, भुमकर चौक
शिवाजीनगर : संचेती चौक
येरवडा : संगमवाडी पार्किंग
लोणी काळभोर : कदम-वाक वस्ती, लोणी स्टेशन चौक, थेऊर फाटा चौक, पालखी विसावा खडकी

सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून नवले ब्रिजमधील अपघात कसे कमी करता येतील, यासाठी उपाययोजना सुरू आहेत. ब्लूमबर्ग या संस्थेमार्फत ब्लॅकस्पॉटची माहिती घेऊन अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी जिओ मॅपिंगसारख्या प्रणालीचा वापर केला जात आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. विशेषकरून तरुण-तरुणींनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
                              – विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.

वाहन चालवताना हे करा…
दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेटचा वापर करा
दुचाकीवर मागे बसणार्‍याने हेल्मेट परिधान करावे
वेगावर नियंत्रण ठेवा
वाहतुकीचे नियम पाळा
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा
सिग्नलला सकारात्मक प्रतिसाद द्या
लेन कट, राँग साईड वाहन चालवू नका

Back to top button