Share Market Closing Bell | सेन्सेक्स ६२ हजारांवर बंद, ‘या’ शेअर्सची दमदार कामगिरी | पुढारी

Share Market Closing Bell | सेन्सेक्स ६२ हजारांवर बंद, 'या' शेअर्सची दमदार कामगिरी

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवहार राहिले. तर आज भारतीय शेअर बाजारात खालच्या स्तरावरुन रिकव्हरी दिसून आली. फायनान्सियल स्टॉक्समध्ये आज तेजी राहिली. मेटल, एनर्जी, एफएमसीजी शेअर्सवर दबाव राहिला. तर क्षेत्रीय निर्देशांकात ॲटो स्टॉक्स आघाडीवर होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात घसरणीसह सुरुवात केलेला सेन्सेक्स निचांकावरून सुमारे ५०० अंकांनी वाढला. त्यानंतर सेन्सेक्स १२३ अंकांनी वाढून ६२,०२७ वर बंद झाला. तर निफ्टी १७ अंकांच्या वाढीसह १८,३१४ वर स्थिरावला. आज सुमारे १,६४० शेअर्स वाढले. तर १,८२३ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४५ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. (Share Market Closing Bell)

आजच्या ट्रेडिंगमध्ये आयशर मोटर्सचा शेअर टॉप गेनर्स होता. हा शेअर्स ५.८६ टक्क्यांनी वाढून ३,६०४ रुपयांवर (eicher motors share price) पोहोचला. तर हिंदाल्कोचा शेअर्स ३.५८ टक्क्यांनी घसरून ४०५ रुपयांवर आला.

सेन्सेक्सवर आज एम अँड एम, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढले. तर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले होते.

Eicher Motors शेअर्सचा उच्चांक

चौथ्या तिमाहीत नफ्यात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर Eicher Motors चे शेअर्स ५.८६ टक्क्यांनी वाढले. हा शेअर आज ६.८४ टक्के वाढून ३,६०४ रुपयांवर पोहोचला. हा सहा महिन्यातील उच्चांक आहे.

अदानींचे ‘हे’ शेअर्स लोअर सर्किटमध्ये

अदानी समुहाला (Adani group) आणखी एक धक्का बसला आहे. मार्गन स्टेनली कॅपिटल इंटरनॅशनल (MSCI) ने जाहीर केले की ३१ मे पासून अदानी समुहातील दोन कंपन्या MSCI इंडिया इंडेक्समधून बाहेर पडतील. त्यात अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) यांचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. अदानी टोटल गॅसचे शेअर ५ टक्क्यांनी घसरून ८१२.६० रुपयांवर आला. BSE वर या शेअरला लोअर सर्किट लागले आहे. तर अदानी ट्रान्समिशनचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ८७१.१५ पर्यंत खाली आला.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

कच्च्या तेलाच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी दबाव दिसून आला. कच्च्या तेलाच्या दरात १.५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गुरुवारी ब्रेंट क्रूडचा भाव १.८७ टक्के घसरून प्रति बॅरल ७४.९८ डॉलरवर आला आहे. दरम्यान, डॉलर इंडेक्स २ आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button