SIP : ‘एसआयपी’चा हप्ता चुकवू नका! | पुढारी

SIP : ‘एसआयपी’चा हप्ता चुकवू नका!

गेल्या दोन-तीन वर्षांत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांची रुची वाढली आहे. बहुतांश किरकोळ गुंतवणूकदार हे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत. किरकोळ किंवा लहान गुंतवणूकदार हे शेअर बाजाराच्या जोखमीपासून वाचण्यासाठी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून बाजारातील तेजीचा लाभ घेऊ इच्छितात. एसआयपीच्या माध्यमातून लहान गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकत राहतात. काहीवेळा खात्यात शिल्लक नसल्याने एसआयपीचा हप्ता चुकतो. त्यामुळे त्याला नुकसान सहन करावे लागते.

एसआयपीअंर्तगत देण्यात येणारा हप्ता म्युच्युअल फंड कंपनीला कसा मिळतो आणि एखादा हप्ता चुकला तर काय नुकसान होते, हे जाणून घेऊ.

ऑटो पे सुविधामुळे हप्त्याचा भरणा

एसआयपी म्हणजे सीपच्या माध्यमातून म्युच्युअल फंड कंपन्या ऑटो पे सिस्टीमच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा मासिक हप्ता घेत असतात. गुंतवणूकदाराच्या खात्यातून पैसे काढून घेण्याचा अधिकार म्युच्युअल फंड कंपन्यांना दिला जातो. या सुविधेमुळे मासिक हप्ता हा दरमहा म्युच्युअल फंड हाऊसकडे जमा होत राहतो.

खात्यात पैसे नसल्यास…

एखाद्या महिन्यात गुंतवणूकदाराच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील तर म्युच्युअल फंडकडून पैसा काढून घेतला जात नाही. त्यामुळे त्या महिन्याचा एसआयपी खात्यातून जात नाही. अर्थात, म्युच्युअल फंड हाऊसकडून ग्राहकांना कोणतीही पेनल्टी आकारली जात नाही. तसेच पुढच्या महिन्यात हप्ता कापून घेण्याची प्रक्रिया ही सुरूच राहते. पुढच्या महिन्यात म्युच्युअल फंड कंपनीला हप्ता मिळाला, तर एसआयपी खाते सुरू राहते आणि त्यात कोणताही अडथळा येत नाही.

म्युच्युअल फंड हाऊसकडून एसआयपीच्या माध्यमातून मासिक हप्ता मिळवण्यासाठी विनंती केली जाते. मात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसा नसल्यास रिक्वेस्ट बाउन्स होते तेव्हा म्युच्युअल फंड हाऊसकडून कोणताही दंड आकारला जात नसला, तरी बँकेकडून अडीचशे ते पाचशे रुपयांपर्यंत पेनल्टी आकारली जाते. प्रत्येक बँकेचा दंड हा वेगळा आहे. त्यामुळे ठरलेल्या तारखेला बँकेत पैसे असणे गरजेचे आहे.

सतत तीन हप्ते चुकवू नये

एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार्‍या कोणत्याही ग्राहकाचे सलग तीन हप्ते चुकल्यास, त्याचे म्युच्युअल फंड खाते बंद केले जाते. त्यानंतर काही प्रमाणात शुल्क भरून ते खाते सक्रिय करता येते. अर्थात, खाते बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित राहतो आणि पैसे केव्हाही काढता येतो. परंतु एखाद्या कारणामुळे हप्ता देण्यात अडचणी येत असतील, तर अशा वेळी म्युच्युअल फंड हाऊसला यासंदर्भात माहिती देणे गरजेचे आहे. अशा स्थितीत म्युच्युअल फंड हाऊसकांनी गुंतवणूकदाराच्या खात्याला हप्ता घेण्याची विनंती पाठविणार नाही, जेणेकरून बँकेकडून कोणत्याही प्रकारची पेनल्टी वसूल केली जाणार नाही.

परताव्यावर परिणाम

गुंतवणूकदारांनी आपल्या खात्यात पुरेसे शिल्लक ठेवणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडकडून हप्त्याची मागणी करणारी रिक्वेस्ट नामंजूर होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. यामुळे बँकेची पेनल्टी बसणार नाही. बँकेत पुरेसे पैसे नसल्याने सतत पेनल्टी आकारली जात असेल, तर गुंतवणूकदाराच्या परताव्यावर नक्कीच परिणाम होईल.

जगदीश काळे

Back to top button