Maharashtra Political Crisis: सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही – जयंत पाटील | पुढारी

Maharashtra Political Crisis: सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही - जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन: सर्वोच्च न्यायालयाने आज सत्तासंघर्षावर निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यातील शिंदे सरकार वाचले असले तरी, त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून जयंत पाटील यांनी ट्विट करत, सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मत व्यक्त केले आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे. भरत गोगावले यांचा व्हिप सुप्रीम कोर्टाने अमान्य केल्याने विधानसभेत घडलेली सर्वच कृती ही अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने नमूद केलेल्या मुद्यांच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागेल. यामध्ये विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणाचे करू शकणार नाहीत, असे देखील ते म्हणाले.

पण हे सरकार अवैध आणि घटनाबाह्यच…

शिंदे सरकार वाचले हा सत्तेभोवतीचा क्षणिक आनंद ठरू शकतो. पण हे सरकार अवैध आणि घटनाबाह्यच आहे. पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर मविआला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे, यावरूनच सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते, असेही जयंत पाटील हे ट्विटमध्ये म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी काय करावे, हे सांगण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही

कोर्टाच्या आजच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणेच अन्यायकारक ठरेल. सरकार स्थापन केले त्यावेळी त्यांच्याकडे कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे त्यांनी नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल, तर ते राजीनामा देणार नाहीत. परंतु मुख्यमंत्र्यांनी काय करावे, हे सांगण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही असे ही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button