Sharad Pawar News Updates | राष्ट्रवादीच्या ठरावानंतर शरद पवार खरंच यू टर्न घेतील का? | पुढारी

Sharad Pawar News Updates | राष्ट्रवादीच्या ठरावानंतर शरद पवार खरंच यू टर्न घेतील का?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. शरद पवारांचा राजीनामा एक मताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे, असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीने (NCP committee) केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. (Sharad Pawar News Updates)

समितीची बैठक झाल्यानंतर समितीचे निमंत्रक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, मागील २ मे च्या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी त्यांनी आपल्या भाषणात अचानक पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. मी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असे सांगत त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी एक समिती नेमली होती. समितीचे निमंत्रक म्हणून मला जबाबदारी दिली होती. खरे तर त्यांच्या भाषणात त्यांनी जे काही उद्गार व्यक्त केले. त्यानंतर आम्ही सगळेजण स्तब्ध झालो. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की शरद पवार असा काही निर्णय कार्यक्रमात जाहीर करतील. पण पक्षाचे नाव आणि आधारस्तंभ फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. शरद पवार हे राज्यातच नव्हे तर देशामध्ये सन्मान असलेले नेते आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांच्या नेतृत्वाची व्यापकता प्रचंड आहे. त्यांच्या निर्णयानंतर दोन-तीन दिवसात देशातील अनेक मान्यवर नेत्यांनाही धक्का बसला त्यांनीही निर्णय मागे घ्यावा म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवार यांनी सक्रिय पदावरून जाऊ नये असे मत त्यांनी सर्वांनी व्यक्त केले. (Sharad Pawar News)

राष्ट्रवादी काँग्रेसचा जेथे जेथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्या सर्वांच्या मनात पवार साहेबांच्या निर्णयाने दुःख आणि वेदना आहे. शरद पवारांनी हा निर्णय आम्हा कोणाला विश्वासात न घेता जाहीर केला होता, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

समितीने बैठकीत एक ठराव पारित केला आहे. तो ठराव सर्वानुमते पारित केला आहे. आता हा ठराव घेऊन आम्ही शरद पवारांना भेटून राजीनामा मागे घेण्याबाबत विनंती करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्हा सर्वांची सामूहिक भावना हीच आहे की शरद पवार यांनीच पदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. हीच भावना देशातील कोट्यावधी जनतेचीही आहे. त्यांनी आमच्या भावनांचा आदर करावा, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जल्लोष

समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळल्यानंतर प्रदेश कार्याबाहेर जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांच्या नावाने घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर समितीतील नेते बाहेर पडत असताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

कार्याध्यक्षाच्या निर्णयावर मौन

दरम्यान, निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचे वयोमान पाहता त्यांना सहकार्य व्हावे म्हणून कार्याध्यक्ष नेमण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य नेत्यांनीही कार्याध्यक्षाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button