शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय बदलण्यासाठी प्रयत्नशील : जयंत पाटील | पुढारी

शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय बदलण्यासाठी प्रयत्नशील : जयंत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे देशात पक्ष वाढला असून, वेगवेगळ्या देशांतील कार्यकर्ते त्यांच्या नावामुळे जोडलेले आहेत. त्यांनी अध्यक्षपदावरून बाजूला जाणे ही पक्षाची हानी आहे. त्यामुळे देश आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येऊ शकत नाही. आज त्यांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्या बद्दल स्वतःहून घोषित केलेला निर्णय योग्य नसून तो बदलावा, यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. साखर संकुल येथे एका बैठकीसाठी बुधवारी (दि.3) ते आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

सभांच्या तारखांमध्ये बदल

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभा उन्हाळ्यामुळे घेणे हे थोडेसे अवघड होणार आहे. त्यामुळे तारखा बदलण्याचा निर्णय 1 तारखेस अनौपचारिक चर्चेत व्यासपीठावर झाला आहे. वज्रमूठ सभांच्या तारखा बदलून त्या पुढे ढकलायच्या अशी चर्चा झाली. त्या वेळी उद्धव
ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि मी उपस्थित होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुनगंटीवार यांचा राष्ट्रवादीबद्दल तोल का जातोय?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यात वेगळे काय आहे? असा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीबद्दल बोलताना तोल का जातो, हे मला समजत नाही. ते राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यांची काही विधाने मी गेल्या चार दिवसांत बघितली असता, राष्ट्रवादीबद्दल प्रचंड तिरस्कार दिसतोय आणि ते चुकीची विधाने करतात. कोणत्याही मुद्द्यावर टेक्निकल मुद्दे उपस्थित करून राजकारण होत नसते. राजकारण हे लोकांच्या, समाजाच्या मनावर आणि मानण्यावर असते.’

Back to top button