सामाजिक, राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घ्या : सुजात आंबेडकर | पुढारी

सामाजिक, राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घ्या : सुजात आंबेडकर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात झालेल्या आंदोलनावेळी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलीस दप्तरी नोंद झालेले गुन्हे मागे घ्यावे, अशी वंचित बहुजन युवा आघाडीची भुमिका आहे. २०१४ ते १९ या काळात मराठा आंदोलन, भीमा- कोरेगाव, आरे आंदोलन अशा प्रमुख आंदोलनातील हे गुन्हे आहेत. आमच्या माहितीप्रमाणे ५७ हजार कार्यकर्त्यांच्यावर पोलीस दप्तरी गुन्हे दाखल असून यापेक्षाही जास्त गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे, अशी माहिती युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुंबई येथे गुरुवारी (दि.४) पत्रकार परिषदेत दिली.

दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत सुजात आंबेडकर बोलत होते. यावेळी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा, महासचिव राजेंद्र पातोडे, मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर उपस्थित होते.

सुजात आंबेडकर म्हणाले, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. अनेक शासन निर्णय काढले आहेत. मात्र;अंमलबजावणी झालेली नाही. ५ लाख रूपये पेक्षा कमी नुकसान व जखमी नसतील तर ते गुन्हे मागे घेण्यात यावा असा शासन निर्णय काढला होता. परंतु, त्यात ही काहीही झालं नाही. २०१८ पासुनचे हे शासन निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

आपल्यावर अन्याय झाला तर आपण आंदोलन करतो. जर असे आंदोलन करणाऱ्या युवकांवर गुन्हे किंवा तडीपारीची कारवाई करत असेल तर लोकशाहीला ते घातक आहे. भीमा कोरेगाव, आरे आंदोलन आदी आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना परदेशात शिक्षणासाठी जाता येत नाही तर सरकारी नोकरीवेळी प्रश्न उद्भवतो. या मुद्यावर वंचित बहूजन युवा आघाडी आक्रमक भुमिका घेत आहे. ज्याच्यावरती गुन्हे दाखल आहे त्यांच्यासोबत आम्ही लढ्यात सहभागी राहणार आहे. आंदोलनातील गुन्हा संदर्भात एकत्रित माहिती करणार आहे.

आमच्या माहितीप्रमाणे २०१४ ते १९ काळातील हे गुन्हे आहेत तर राज्य सरकारला नेमका किती गुन्हे दाखल आहेत हे माहित नाही. ज्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ज्याच्यावर राजकीय, सामाजिक आंदोलन प्रकारचे गुन्हे आहेत. त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीला माहिती द्यावी.

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या सद्यस्थितीबद्दल मी काही बोलू शकणार नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष राजीनामाचा हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button