शरद पवार यांच्या निवृत्तीच्‍या निर्णयाचा ‘मविआ’वर परिणाम होणार नाही : संजय राऊत | पुढारी

शरद पवार यांच्या निवृत्तीच्‍या निर्णयाचा 'मविआ'वर परिणाम होणार नाही : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादीच्या राष्‍ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त हाेण्‍याचा निर्णय घेतला आहे. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मुद्दा आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्‍वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्‍यक्‍त केला.

यावेळी राऊत म्‍हणाले की, शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा केवळ प्रतिभाताई आणि सुप्रियाताई यांना माहीत असावा. त्‍यांनी आज अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांची मनधरणी करतील. तो त्यांचा हक्क आहे. पवार थोडे निवांत झाले की आम्ही त्यांची भेट घेऊ, असेही राऊत यांनी सांगितले.

सध्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता; पण शिवसैनिकांच्या प्रेमामुळे त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. बाळासाहेबांप्रमाणेच शरद पवार हेही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत, असेही राऊत म्‍हणाले.

भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला

राऊत यांनी पवार यांच्या राजीनाम्यानंतर एक ट्विट देखील केले आहे. ट्विटमध्‍ये त्‍यांनी म्‍हटले आहे की,  त्यांनी भाकरी फिरवण्याबाबत सांगितले होते पण आता तवाच फिरवला आहे.

हेही वाचा

Back to top button