शरद पवार: 'जिथे आमचा देव नाही, तिथे आमचा नमस्कारही नाही' म्हणत राष्ट्रवादी पुणे पदाधिकार्‍यांचा राजीनाम्याचा इशारा | पुढारी

शरद पवार: 'जिथे आमचा देव नाही, तिथे आमचा नमस्कारही नाही' म्हणत राष्ट्रवादी पुणे पदाधिकार्‍यांचा राजीनाम्याचा इशारा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. या घोषणेचे पडसाद पुणे शहरात उमटले आहेत. शहरातील प्रमुख़ पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांकडून शहर कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले जात आहे. यावेळी अनेक कार्यकर्ते भावुक झाले असून पवार साहेबांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामा देऊ, अशा इशारा शहराध्यक्षांसह इतरांनी दिला आहे.

‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या पुस्तकाचे पुर्नप्रकाशन मंगळवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात झाले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. गेली 24 वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. आता कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असणे योग्य नाही. तुम्हाला कदाचित अस्वस्थता वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. असे म्हणत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा, अशी सूचना केली.

शरद पवारांच्या या घोषणेमुळे राज्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांकडून भावनिक साद घातली जात आहे. याचे पुण्यातही चांगलेच पडसाद उमटत आहेत. शहरातील पदाधिकार्‍यांनी पवार साहेबांनी आपला निर्णय मागे न घेतल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर कार्यालयाच्या परिसरात जमा झाले आहेत.

दरम्यान, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत ट्विट केले आहे. कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही. अगदी तसंच पवार साहेबांनी अध्यक्षपद सोडू नये, साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारिणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत. जिथे आमचा देव नाही, तिथे आमचा नमस्कारही नाही असं देखील जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Back to top button