

घाटकोपर; पुढारी वृत्तसेवा मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. ही सहा मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर काही नागरिक अडकले होते. त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी सुखरूप सुटका केली. तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. पोलिस व अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुलुंड मधील धीरज अपार्टमेंट आग दुर्घटना प्रकरणांमध्ये मुलुंड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राजेंद्र हनुमंत शिंदे, अर्जुन राठोड या दोघांनी प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. या दोघा पोलिसांनी दाखविलेल्या समय सुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुलुंड पोलीस ठाण्यातील या दोन पोलीसांचे आणि मुलुंड पोलीस ठाण्याचे स्थानिकांनी कौतुक करीत आभार मानले.
हेही वाचा :