‘एमपीएससी’साठी अहमदनगर जिल्ह्यात 77 उपकेंद्रे, 71 परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश | पुढारी

‘एमपीएससी’साठी अहमदनगर जिल्ह्यात 77 उपकेंद्रे, 71 परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नगर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि. 30) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. त्यासाठी जिल्ह्यात 77 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, नगर उपविभाग हद्दीतील 71 उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील 77 परीक्षा केंद्रांवर सकाळी 11 ते 12 या वेळेत परीक्षा होणार आहे. परीक्षा देणारे उमेदवार, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी रविवारी (दि. 30) सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत 71 परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिघामध्ये असलेले सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॅक्स केंद्रे, ध्वनिक्षेपक, झेरॉक्स मशीन, स्कॅनिंग मशिन, मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वस्तू कार्यान्वित ठेवू नयेत, त्याचप्रमाणे परीक्षा उपकेंद्राच्या परिघामध्ये उचितरीतीने परीक्षार्थी म्हणून घोषित केलेले उमेदवार व परीक्षा पार पाडण्यासाठी सक्षम अधिकार्‍यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना या परिसरात प्रतिबंध असेल.

Back to top button